सावधान! डिकोल्ड टोटल, सॅरिडॉनसह तब्बल ३२७ गोळ्याऔषधांवर बंदी
एकाच औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटकांचा वापर करून जी औषधे तयार केली जातात त्या औषधांना 'एफडीसी' म्हणून ओळखले जाते.
'फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन' (एफडीसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल ३२७ गोळ्याऔषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. एकाच औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटकांचा वापर करून जी औषधे तयार केली जातात त्या औषधांना 'एफडीसी' म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारच्या औषधांचे सेवन करणे हे रूग्णाच्या आरोग्यास हानीकारक असते. या औषधांमुळे भविष्यात निर्माण होणारा धोका विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने बंदीची कारवाई केली. केंद्राच्या आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे ही औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना चांगलाच दणका बसला आहे. खास करून डिकोल्ड टोटल, सॅरेडॉनसारख्या झटपट प्रभाव दाखवणाऱ्या गोळ्यांवरही बंदी आहे. त्यामुळे त्या यापुढे उपलब्ध होणार नाहीत.
झटपट प्रभाव वृत्तीमुळे आरोग्यास धोका
गेल्या काही वर्षांत लोकांचे बदललेली जीवनशैली, ताण-तणाव, पर्यावरणातील बदल, वाढते प्रदुषण आदींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मात्र, यांत्रिकीकरणाप्रमाणे मानवी जीवनातही झटपट प्रभाव ही मागणी वाढू लागली आहे. जसे की, एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीस काही किरकोळ त्रास असेल (सर्दी, खोकला) तरीही या त्रासातून बाहेर पडण्यासाठी ठराविक काळ वाट पाहण्यापेक्षा पटकत बरे होण्याकडे कल वाढतो आहे. त्यासाठी मग वापरली जाणारी प्रतिजैवके (अँटीबायोटीक्स) अधिक धोकादायाक ठरत आहेत. अनेकदा डॉक्टरही किरकोळ आजारांसाठी प्रतिजैवकांचे डोस देताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांना या औषधांमुळे पटकन बरे वाटू लागल्याने त्यांचेही भविष्यातील दुष्परीणामांकेड विशेष लक्ष नसते. मात्र, भविष्यात याचे दुष्परीणाम मोठ्या प्रमाणात सोसावे लागतील याकडेही वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधत होते.
निर्णयाचे स्वागत
अखेर औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३२७ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली. मात्र, या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन योग्य असल्याबद्दल औषध कंपन्यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान, त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली. औषधांमधील हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हितकारक नसल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेली समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींचाही विचार हा निर्णय घेताना करण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णायाचे अनेक मेडिकल विक्रेते आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी स्वागत केले आहे.