Digital Education: ऑनलाईन शिक्षणासाठी 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन व लॅपटॉपच नाहीत; 28 टक्के विद्यार्थ्यांकडे विजेची कमतरता- NCERT Survey

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून देशात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. सध्या विद्यार्थी अशाच ऑनलाईन वर्गातून शिकत आहेत. परंतु ऑनलाइन वर्ग गाठायला 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि लॅपटॉपच नाहीत.

Online Education (Photo Credit : Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) गेले अनेक महिने शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून देशात ऑनलाईन शिक्षणाला (Online Education) प्राधान्य दिले जात आहे. सध्या विद्यार्थी अशाच ऑनलाईन वर्गातून शिकत आहेत. परंतु ऑनलाइन वर्ग गाठायला 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि लॅपटॉपच नाहीत. तर 28 टक्के विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वीज उपलब्ध नाही. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. एनसीईआरटी ने हे सर्वेक्षण, 34,000 लोकांवर केले होते, ज्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसई संलग्न शाळांचे मुख्याध्यापक यांचा समावेश होता.

यामध्ये दिसून आले की, शैक्षणिक हेतूसाठी उपकरणाच्या वापराचे ज्ञान नसणे आणि शिक्षकांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतींची पूर्ण माहिती नसणे यामुळे शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी मोबाईल फोनचा वापर करत आहेत. मात्र यातील 27 टक्के विद्यार्थ्यांकडे फोन नसणे ही मोठी चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

यात म्हटले आहे की सुमारे 36 टक्के विद्यार्थी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके वापरत आहेत. लॅपटॉप हा शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये दुसरा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. कोरोना साथीच्या दरम्यान, टीव्ही आणि रेडिओ ही शिक्षणसाठी सर्वात कमी वापरली जाणारी साधने आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवादाचा अभाव ही गोष्टही समोर आली आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, जवळपास सर्व संबद्ध राज्ये शिक्षण घेणाऱ्यांच्या प्रगतीवर लक्ष  ठेवण्यासाठी शारिरीक किंवा नॉन-डिजिटल मीडियाचा वापर करतात आणि यासाठी बहुतेक शिक्षक घरी जातात किंवा फोन कॉलचा वापर करतात. (हेही वाचा: नंदुरबारच्या शिक्षकाची चिकाटी; जमिनीवर मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने चक्क झाडावर चढून मुलांना शिक्षण (See Photo)

अर्ध्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे शालेय पाठ्यपुस्तके नाहीत. ई-पुस्तके एनसीईआरटी वेबसाइट आणि दीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र ई-पाठ्यपुस्तकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. ऑनलाइन माध्यमाद्वारे गणिताच्या विषयाचा अभ्यास करणे अवघड असल्याचे समोर आले आहे. कारण त्यात अनेक संकल्पना आहेत व यासाठी मुलांशी शिक्षकांचा संवाद, सतत सहकार्य आणि देखरेख आवश्यक आहे.