फटाके बंदीसाठी पाच वर्षाच्या या '3' चिमुकल्यांनी सर्वोच्च न्यायालायात मागितली होती दाद
2015 साली अवघ्या काही महिन्यांचे असताना अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया राव भसीन या तीन चिमुकल्यांनी फटाक्यांच्या धूराचा लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर होणारा दुष्परिणाम न्यायालयासमोर ठेवत याचिका सादर केली होती.
यंदाचा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रोषणाईचा हा सण फटाक्यांच्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे फटाक्यांवरील बंदी कायम ठेवावी का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला आहे. फटाके उडवण्यास यंदा सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.
सण उत्साहात साजरा करण्याच्या नादात अनेकदा कळत-नकळत पर्यावरणाचं नुकसान होतं. मोठ्या प्रमाणात फटाके उडवल्याने ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्याच्या धूरामुळे वातावरणात धूर अधिक प्रमाणात जमा होतो. यामुळे स्मॉग़ निर्माण झाल्याने अपघातांपासून ते अगदी श्वसनाच्या रोगांपर्यंतचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी दिल्ली आणि लगतच्या परिसरात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती.
फटाक्यांच्या बंदीसाठी तीन चिमुकल्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. फटाक्यातून होणार्या प्रदुषणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर प्रामुख्याने परिणाम होतो.
चिमुकल्यांची न्यायालयात धाव
फटाक्यांवरील बंदीसाठी 2-4 या वयोगटातील तीन मुलं सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया राव भसीन या तीन चिमुकल्यांनी फटाक्यांच्या धूराचा लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर होणारा दुष्परिणाम न्यायालयासमोर ठेवत याचिका सादर केली होती. मुलांपैकी अर्जुन गोपाल याचे वडील गोपाल सुब्रह्मण्यम यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.
2015 साली अवघ्या काही महिन्यांचे असताना ते सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. इतक्या चिमुकल्यांनी याचिका सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती.
लहान मुलं सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात ?
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा, दाद मागण्याचा अधिकार चिमुकल्यांनाही आहे. आई वडील किंवा पालकांच्या मदतीने न्यायालयात ते आपली बाजू मांडू शकतात. या तीन चिमुकल्यांनीही याचिकेमध्ये लहान मुलांमधील अविकसित फुफ्फुसे अनेक श्वसन आजरांना निमंत्रण असल्याचे म्हटले आहे. यामधून लहान मुलांमध्ये अस्थमा, खोकला, ब्रोन्कायटीस, चेतासंस्थेवर होणारा परिणाम, मूकबधीरपणा येणं अशा अनेक समस्यांचा संभाव्य धोका ठळकपणे अधोरेखित केला आहे.
फटाके बंदी आणि सर्वोच्च न्यायालय
नोव्हेंबर 2016 साली सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र केवळ फटाकेच प्रदूषणाचं कारण आहे हे न्यायालयात सिद्ध होऊ न शकल्याने ती उठवण्यात देखील आली.