African Swine Fever: केरळच्या कोट्टायममध्ये आढळले आफ्रिकन स्वाइन फीवरचे प्रकरण; 48 डुकरांचा मृत्यू, मांस विक्रीवर बंदी

एपिडेमियोलॉजिस्ट राहुल एस यांनी सांगितले की, कोट्टायम जिल्ह्यात 13 ऑक्टोबर रोजी पहिली केस आढळली.

Pig (Photo Credits: PixaBay)

African Swine Fever: केरळमधील (Kerala) कोट्टायम (Kottayam) जिल्ह्यातील एका खाजगी डुक्कर फार्ममध्ये आफ्रिकन स्वाइन फीव्हरची (African Swine Fever) लागण झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसांत 6-7 डुकरांचा मृत्यू झाला आहे. एपिडेमियोलॉजिस्ट राहुल एस यांनी सांगितले की, कोट्टायम जिल्ह्यात 13 ऑक्टोबर रोजी पहिली केस आढळली. त्यानंतर पुढील 2-3 दिवसांत शेतातील 6-7 डुकरांचा मृत्यू झाला आहे. आम्ही नमुना तपासणीसाठी पाठवला आहे, जिथे या विषाणूची पुष्टी झाली आहे.

एपिडेमियोलॉजिस्ट राहुल यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्याच्या शेतात एकूण 67 डुकरे होती, त्यापैकी 19 आधीच मेली होती आणि आम्ही 48 डुकरांना मारले आहे. या भागात जनावरांची वाहतूक आणि विक्री, जनावरांच्या मांसाची विक्री आणि जनावरांची वाहतूक करणारी वाहने यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. (हेही वाचा - WHO on Coronavirus: कोरोना महामारी संपलेली नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता, दिला 'हा' सल्ला)

त्याच वेळी, केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील डुक्कर फार्ममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूच्या प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी डुकराचे मांस विकणारी मांसाची दुकाने बंद केली. तसेच, बाधित भागातून डुक्कर नेले जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी पावले उचलली आहेत.

20 हजार पक्षी मारण्याच्या सूचना -

याआधी केरळमध्ये एव्हियन फ्लूमुळे 20 हजारांहून अधिक पक्ष्यांना मारण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदकांमध्ये एव्हियन फ्लूची पुष्टी झाली. त्यानंतर केरळमध्ये पक्षी मारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. फ्लूची पुष्टी झाल्यानंतर अलप्पुझा जिल्ह्यात हजारो पक्षी मारले जात आहेत.

आफ्रिकन स्वाइन ताप म्हणजे काय?

आफ्रिकन स्वाइन फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. ज्याचा मृत्यू दर 100 टक्के आहे. विषाणूचा प्रादुर्भाव घरगुती आणि रानडुकरांना प्रभावित करतो. तथापि, या विषाणूचा मानवांवर परिणाम होत नाही. परंतु शारीरिक संपर्काद्वारे ते एका डुक्करातून दुसर्‍या डुक्कराकडे जातो.