Triple Seat Movie Review: एका मिस कॉलमुळे सुरु झालेला हा गोंधळ तुमच्या सहनशक्तीचा अंत घेईल
चित्रपट संपल्यानंतर अंकुश चौधरीचा अभिनय आणि शिवानी सुर्वेचे लुक्स वगळता लक्षात राहण्यासारखे काहीही नाही.
एक काळ होता जेव्हा दिवाळीत दर्जेदार चित्रपट प्रदर्शित व्हायचे, मात्र यंदा दिवाळीत प्रदर्शित झालेल्या दोन्ही मराठी चित्रपटांनी चाहत्यांची निराशा केली. संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ (Triple Seat) आज प्रदर्शित झाला. एक रोमँटीक-कॉमेडी अशी या चित्रपटाची जाहिरात करण्यात आली होती. मात्र चित्रपटात प्रेमकथेच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली कॉमेडी पूर्णतः फसली आहे. तीच नेहमीची परिस्थिती, तेच रटाळ विनोद, तेच हावभाव, तोच अभिनय म्हणजेच प्रेक्षकांना अगदी गृहीत धरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपट संपल्यानंतर अंकुश चौधरीचा (Ankush Chaudhari) अभिनय आणि शिवानी सुर्वेचे (Shivani Surve) लुक्स वगळता लक्षात राहण्यासारखे काहीही नाही.
कथा –
ट्रिपल सीटची कथा घडते अहमदनगर शहरात. कृष्णा म्हणजेच अंकुश चौधरी आपले वडील (विद्याधर जोशी) आणि बहिणीसोबत एक छान आयुष्य जगत असतो. आई गेल्यानंतर वडिलांचे दारू पिणे सुरु होते त्यामुळे कृष्णा त्यांच्याशी बोलणे सोडून देतो. यासाठी तो वडील दारू पिऊन त्रास देतात असे कारण देतो, मात्र चित्रपटात एक सीन वगळता कुठेही त्यांच्या त्रासाचा उल्लेख नाही. उलट विद्याधर जोशींचा चेहराच असा आहे की कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कोणी चिडू शकणार नाही. तर अचानक कृष्णाला तन्वी म्हणजे शिवानी सुर्वेकडून एक मिस कॉल येतो आणि त्याचे आयुष्य बदलून जाते. आता हा मिस नक्की कशासाठी येतो ते पाहायला तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. पुढे अर्थातच तन्वी आणि कृष्णाचे रोजचे मिस कॉल्स, रोज बोलणे, बोलताना भान न राहणे वगैरे सुरु होते.
त्यानंतर अचानक कृष्णाचे वृंदा (पल्लवी पाटील) नावाच्या दुसऱ्याच एका मुलीशी लग्न ठरते. इकडे तन्वीचे वडील आपल्या पोटी एक मुलगी जन्माला आली म्हणून तिचा द्वेष करत असतात, तिला मारतही असतात. असे हे रागीट वडील तन्वी आणि कृष्णाचे बोलणे ऐकतात व तन्वी आणि कृष्णा एकमेकांशी लग्न करत आहेत असे समजून ते तिला खोलीत डांबून ठेवतात. दुसऱ्या दिवशी कृष्णाचा साखरपुडा असतो आणि त्याच दिवशी तन्वी घरातून पळून जाते. त्यानंतर कृष्णावर संशय घेऊन पोलीस त्याला पकडतात, मात्र तन्वी पोलीस स्टेशनला येऊन आपले व कृष्णाचे प्रेम असल्याचे खोटे सांगते. हे पाहून तो पोलिसच दोघांचे जबरदस्तीने लग्न लावून देतो. आता इकडे तन्वी आणि तिकडे वृंदा अशा स्थितीत अडकलेला कृष्णा नक्की काय करेल ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
पटकथा –
चित्रपटाची पटकथा ही एखाद्या मोंताज म्हणजेच छोटे छोटे शॉट्स एकत्र करून बनवल्यासारखी वाटते. अनके सिन्स जबरदस्तीने घुसवले आहेत. कोणत्याही सिन्स मधून एखादी भावना अथवा परिस्थिती स्पष्ट होत नाही, त्यामुळे नक्की काय आणि का चाललय हेच समजत नाही. महत्वाचे म्हणजे फर्स्ट हाफच्या 45 मिनिटापर्यंत काहीच घडत नाही त्यानंतर अचानक अनेक गोष्टी अंगावर येतात. मात्र सेकंड हाफ इतका मोठा आणि लांबलाय की कधी एकदा हा चित्रपट संपतो असे होते.
दिग्दर्शन –
चित्रपटात घडणाऱ्या सर्वच गोष्टी आपण याआधी अनेकदा पहिल्या आहेत. त्यामुळे जसे कथेत काही नाविन्य नाही तसेच दिग्दर्शनाचे. नेहमीचेच शॉटस, तेच छायाचित्रण त्यामुळे चित्रपटामधील एकही शॉट ‘वॉव’ दर्जाचा नाही.
गाणी आणि संगीत –
चित्रपटाच्या संगीतासाठी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे मात्र तोही फसला आहे. चित्रपटामधील एकही गाणे लक्षात राहण्यासारखे नाही उलट शब्दाला शब्द जुळवण्याचा बाळबोध प्रयत्न केल्याने चिडचिडच होते.
अभिनय –
अंकुश चौधरी जवळजवळ सर्वच चित्रपटात एकसमान अभिनय करतो. मात्र त्यातही तो जे काही वेगळेपण आणतो ते वाखाणण्याजोगे असते जे या चित्रपटातही आहे. शिवानी सुर्वे अजूनही तिच्या मालिकांमधील आदर्श सुनेच्या भूमिकेतून बाहेर आलेली नाही. सेकंड हाफमध्ये तर ती टिपिकल आदर्श सून वाटते. प्रवीण तरडे यांनी पोलिसाची भूमिका साकारली आहे. तशीच वैभव मांगलेकर याने तन्वीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या दोन्ही भूमिका अगदी छोट्या आहेत मात्र त्याच जास्त भाव खाऊन जातात. बाकी चित्रपटात इतर असे कोणीही नाही ज्यांच्या भूमिका लक्षात राहील.
मुळात या चित्रपटाला ट्रिपल सीट नाव का दिले इथपासून सुरुवात आहे. चित्रपटामध्ये जरी दोन मुली असल्या तरी कृष्णा आणि वृंदा यांचे सिन्स, प्रेम, जवळीक काहीच चित्रपटात नाही. उलट वृंदाला कृष्णाची लग्न का करायचे आहे तेच समाजात नाही.
चित्रपटामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. तन्वी आणि कृष्णा पाहताचक्षणी एकमेकांशी लग्न करायला कसे तयार होतात? कृष्णा इतका वचनबद्ध कसा काय असू शकतो की वृंदाशी लग्न करायला तो काहीही करायला तयार होतो? तन्वी पोलीस स्टेशनमध्ये खोटे का बोलते? फर्स्ट हाफमध्ये तन्वी आणि कृष्णा जे फोनवर बोलत असतात ते नेमक काय होते? एक पोलीस असे कोणाचेही जबरदस्तीने लग्न लावून देऊ शकतो? हा चित्रपट एका सत्य परिस्थितीवर आधारित असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळते त्यामुळे तुमच्या चित्रपटाकडून अपेक्षाही वाढत जातात. मात्र शेवटी या खऱ्या घटनेला कॉमेडीचा तडका देऊन अगदीच मिळमिळीत प्रेमकथा समोर येते.
फक्त अभिनयासाठी या चित्रपटाला आम्ही देत आहोत 2.5 स्टार