वहिदाच्या आधीही ही अभिनेत्री ठरणार होती 'चौदहवीं का चाँद'

कागज के फूल चित्रपटामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गुरुदत्त यांनी हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांनादेखील हा चित्रपट अतिशय भावाला होता, तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती.

चौदहवीं का चाँद (photo credit - Prime Video)

१९६०चे दशक, गुरुदत्त यांचा मायलस्टोन 'कागज के फूल' पडद्यावर आला. मात्र चित्रपटाची व्यावसायिक गणिते पूर्ण बिघडली आणि चित्रपट सपशेल आपटला. या चित्रपटाचे नुकसान भरून काढण्यासाठी गुरुदत्त यांना एका हिटची गरज होती आणि शेवटी त्यांची नजर पडली 'चौदहवीं का चाँद'च्या कथेवर.

चौदहवीं का चाँद हो या आफताब हो...' गुरुदत्त यांच्या १९६०च्या 'चौदहवीं का चाँद' या चित्रपटातील शकीलजींनी लिहिलेले, रवीच्या संगीतात रफीसाहेबांनी गायलेले एक अजरामर गीत. या गाण्यात चाँद शब्दाचा उपयोग ज्या बेमालूमपणे केला आहे त्याला तोड नाही. या चित्रपटाद्वारे खरच आपल्याला एक चाँद का तुकडा मिळाला तो म्हणजे 'वहिदा रेहमान'. पण याआधी चाँद शब्दाचा वापर झालेली फार कमी गाणी आपल्या चित्रपटात होती, त्यातीलच एक 'खानदान' (१९४२) चित्रपटामधील तू कौनसी बदली में मेरे चाँद हैं...' आणि हे गीत गाणारा व पडद्यावर दिसणारा चाँद होता मलिका-ए-तरन्नुम-नूरजहाँ !

तर नूरजहाँचे पती शौकत हुसेन यांनी वहिदा रेहमान चित्रपट सृष्टीत येण्याआधी म्हणजे ४०च्या दशकात 'चौदहवीं का चाँद'ची योजना आखलेली होती. या चित्रपटाद्वारे जो चाँद अवतरणार होता तो होता नूरजहाँ ! गायिका, अभिनेत्रींमध्ये नूरजहाँ त्या काळात कोणालाही तिची बरोबरी करता येणार नाही अशी होती आणि तसेच होते सैगल. तर शौकतजींना या दोघांना घेऊन हा चित्रपट करायचा होता. मात्र हा चित्रपट फ्लोअरवर येण्याआधीच सैगलजींचे निधन झाले (१८जानेवारी १९४७) आणि पुढे भारताच्या फाळणीनंतर शौकत आपली पत्नी नूरजहाँसह पाकिस्तानला निघून गेले, आणि या चित्रपटाची योजना बारगळली.

पुढे एशिया थीएटरच्या मालकीची ही कथा गुरुदत्तसाहेबांनी मागवून घेतली. त्याकाळी ५ हजार रुपयांना त्यांना ती मिळाली. मात्र एक पंचायत होती, चित्रपटाची कथा व स्क्रीनप्ले उर्दूमध्ये लिहिले होते. गुरुदत्तनी त्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यासाठी अबरार अल्वी साहेबांना पाचारण केले. अबरारजींनी त्यांचे काम चोखपणे केले आणि चित्रपटाला नाव दिले गेले 'एक झलक'.

मुस्लीम पार्श्वभूमी असलेली ही कथा त्यावेळी प्रेक्षक स्वीकारतील याबाबद अबरारजींना खात्री नव्हती, ते चित्रपटाच्या नावाबद्दलही फारसे खुश नव्हते. 'The jade goddess' या जपानी कथेच्या नावावरून त्यांनी या चित्रपटाला चौदहवीं का चाँद हे नाव सुचवले. मात्र तरी या कथेत त्यांना 'दम' वाटत नसल्याने तब्बल ६ वर्षे ही कथा तशीच धूळ खात पडली.

गुरुदत्त यांचे लक्ष या कथेकडे तेव्हा गेले जेव्हा त्यांचा पाय 'कागज के फुल'च्या अपयशाने कर्जाच्या चिखलात रुतला होता. आणि त्यांनी या कथेवर चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. अबरार यांनी स्क्रीनप्ले लिहिला तर साघीर उस्मानी यांनी संवाद. शक्यतो आपल्या गीतांचे दिग्दर्शन गुरुदत्त स्वतः करीत असत आणि चित्रपटाचा इतर भाग दिग्दर्शित केला तो मोहम्मद सादिक यांनी.

संगीताची जबाबदारी होती रवी यांच्यावर. चित्रपटाच्या टायटलसाठी रवी यांनी अनेक धून बनवल्या पण गुरुदत्तना एकही पसंत पडेना, शेवटी रवीजींनी विनंती केल्यामुळे अबरारजींनी ज्या धुनेवर शिक्कामोर्तब केले त्याने इतिहास घडवला. रवीच्या संगीताच्या जादूने लोकांना अशी काही भुरळ घातली की, रफी साहेबांना या गीतासाठी उत्कृष्ट गायकाचा तर शकील साहेबाना उत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रफी साहेबांनी गायलेल्या रोमँटिक गीतांपैकी हे एक उत्कृष्ट गीत म्हणावे लागेल. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटातील गीतांना त्याकाळच्या चार महत्वाच्या आणि लोकप्रिय गायीकेंचा आवाज लाभला त्या म्हणजे लता, आशा, गीता दत्त व शमशाद बेगम. या चित्रपटाने दुसऱ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने भारताचे प्रतिनिधित्व केले.

तर अशाप्रकारे नूरजहाँपासून सुरु झालेली ही कहाणी वहिदापाशी येऊन संपली. या चित्रपटाने गुरुदत्तजींना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त तर केलेच, पण स्वातंत्र्योत्तर काळात संपलेल्या मुस्लीम पार्श्वभूमीवरील सामाजिक चित्रपटांनाही यशाचा एक नवा मार्ग दाखविला.

बोल -

चौदहवीं का चाँद हो, या आफ़ताब हो

जो भी हो तुम खुदा कि क़सम, लाजवाब हो

ज़ुल्फ़ें हैं जैसे काँधे पे बादल झुके हुए

आँखें हैं जैसे मय के पयाले भरे हुए

मस्ती है जिसमे प्यार की तुम, वो शराब हो

चौदहवीं का ...

चेहरा है जैसे झील मे खिलता हुआ कंवल

या ज़िंदगी के साज पे छेड़ी हुई गज़ल

जाने बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो

चौदहवीं का ...

होंठों पे खेलती हैं तबस्सुम की बिजलियाँ

सजदे तुम्हारी राह में करती हैं कैकशाँ

दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क़ का तुम ही शबाब हो

चौदहवीं का ...

(संदर्भ - मुस्लीम सिनेमा :समाज, Ten Years with Guru Dutt)