Muslim Brotherhood: मुस्लिम ब्रदरहुड संघटना विचार, कार्य आणि दहशतवाद
इस्लामिक देशांमध्ये हिचा बराच विस्तार आहे. तर, अनेक अरब देशांमध्ये या संघटनेवर बंदीही आहे.
मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना मुस्लिम ब्रदरहुडशी केल्यामुळे देशाच्या राजकारणात एक खळबळ उडाली. भाजप आणि हिंदुत्ववादी गोटातून राहुल गांधी आणि पर्यायाने काँग्रेसवर टीकेची झोड उडाली. या पार्श्वभूमिवर मुस्लिम ब्रदरहूड हे प्रकरण नेमके काय आहे याचा घेतलेला हा एक धांडोळा...
मुस्लिम ब्रदरहूड संघटना आणि अस्तित्व
मुस्लिम ब्रदरहूड ही एक इस्लामिक संघठना आहे. इस्लामिक राजकारणातील सर्वात जूनी संघटना अशी या संघटनेची ओळख आहे. अरबी भाषेत या संघटनेला अखवानुल मुस्लिमीन असे संबोधले जाते. इस्लामिक देशांमध्ये हिचा बराच विस्तार आहे. तर, अनेक अरब देशांमध्ये या संघटनेवर बंदीही आहे.
संस्थापक
ही संघटना मुळची इजिप्तमधील. हसन अल बन्ना या इस्लामी शिक्षक आणि विचारवंताने विसाव्या शतकात या संघटनेची स्थापना (१९२८) केली. इस्लामच्या अधारावर शासन, समाज आणि राष्ट्र निर्मितीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन बन्ना यांनी ही संघटना स्थापली. सुरूवातीच्या काळात केवळ समाजसुधारणा, समाजप्रबोधन असे स्वरूप असलेली ही संघटना अल्पावधीतच एक राजकीय संघटन केंद्र बनले. ज्याचा प्रसार हळूहळू अरब देशांमध्ये शाखांच्या माध्यमातून पसरला. पुढे अनेक देशांच्या राजकारणात मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना थेट हस्तक्षेप करतना दिसून आली.
मुस्लिम ब्रदरहूड विचारधारा
अरब देशांमध्ये राजकीय सूत्रे प्रत्यक्षपणे हातात घेऊन यंत्रणा राबवने हा संघटनेचा विद्यमान हेतू आहे. त्यासाठी इतर इस्लामी संघटनांना हटवून आपल्या विचारांचे सरकार ही संघटना स्थापन करू इच्छिते. त्यासाठी प्रत्यक्ष राजकारणात उतरून किंवा समांतर विचारांच्या संघटना, राजकीय पक्ष आदिंना पाठींबा देत ही संघटना निवडणुकाही लढवते.
इस्लाम धर्मियांचा जास्तित जास्त पाठिंबा मिळावा यासाठी ही संघटना दान-धर्म, गरीबांना सहकार्य, अशा गोष्टी राबविण्याचा प्रयत्न करते. पण, प्रत्यक्षात संघटनेचे विचार आणि कृती (दहशतवादी कारवाया) यांचा मेळ न बसल्याने ही संघटना जगभरात टीकेचा विषय़ ठरते.
१९२८मध्ये जेव्हा या संघटनेची स्थापना झाली तेव्हा इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनेच्या शाखा उघडण्यात आल्या. तसेच, प्रत्येक शाखेवर एक मशीद, शाळा आणि स्पोर्टक्लब उघडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे, या संघटनेची लोकप्रियता आणि सदस्यताही प्रचंड वाढली गेली. सांगितले जाते की, १९४० पर्यंत या संघटनेची सदस्य संख्या २० लाखांवर पोहोचली.
महत्त्वपूर्ण बाब अशी की, मुस्लिम ब्रदरहूडचा संस्थापक हसन अल बन्ना याने मुस्लिम ब्रदरहूडच्या अंतर्गत इतर छोट्या संघटना (विभाग) प्रमाणे एक सशस्त्र संघटनही उभारले. याच सशस्त्र संघटनेने पुढे इजिप्तमध्ये सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन केले.
मुस्लिम ब्रदरहूड नेतृत्व
संस्थापक हसन अल बन्ना नंतर सुरूवातीच्या काळात या सैय्यद कुतूब शहीद यांनी या संघटनेचे नेतृत्व केले. पुढे या संघटनेचे नेतृत्व मोहम्मद बदी मस्त्र याच्याकडे आले. मोहम्मद बदी हा आजही या संघटनेचा प्रमुख नेता असून, तो तुरूंगात आहे. महत्त्वाचे असे की, २०१३मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती बनलेले मोहम्मद मोर्सी हे सुद्धा एकेकाळी मुस्लिम ब्रदरहूडचे नेते राहिले आहेत. मोर्सी यांचा सध्याचा मुक्काम तुरूंगात आहे.
मुस्लिम ब्रदरहूडवर कारवाई आणि बंदी
मुस्लिम ब्रदरहूड (एमबी) पहिली बंदी ही १९४८मध्ये घालण्यात आली. यहूदी आणि ब्रिटीशांच्या ध्येयधोरणांना विरोध केल्याने ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, याच संघटनेची फूस असलेल्या इजिप्तच्या लष्कराच्या फ्री ऑफिसर्स नावाच्या एका गटाने इजिप्तमध्ये सरकार स्थापन केले होते. ही घटना ब्रिटीशांकडून इजिप्तला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच घडली. गमाल अब्दुल नासिर असे या या गटाच्या (फ्री ऑफिसर्स ग्रूप) प्रमुखाचे नाव होते. सुरूवातीच्या काळात मुस्लिम ब्रदरहूडने नासिरला मदत केली. पण, अल्पावधीतच त्यांच्यात मतभेद झाले. ज्यानंतर नासिर यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला.
वरील सर्व घडामोडींनतर मुस्लिम ब्रदरहूडचा प्रमुख नेता सैय्यद कुतूब याला नासिर सरकारने तुरूंगात टाकले आणि १९६६मध्ये त्याला फाशी दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अनवर अल सादात यांच्याय हत्येतही मुस्लिम ब्रदरहूडचा हात असल्याचे पुढे आले आहे.
अरब जगतात मुस्लिम ब्रदरहूडला आणि त्याच्याशी संबंधीत पक्षांना राजकीय फायदा
अरब राष्ट्रांमध्ये मुस्लिम ब्रदरहूडशी संबंध ठेवलेल्या अनेक राजकीय पक्ष, संघटनांना राजकीय फायदा झाल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी थेट मुस्लिम ब्रदरहूडनेच सरकारमध्ये हस्तक्षेप केला आहे. २०११ मध्ये ट्युनीशियामध्ये राष्ट्रपती जैन अल आबिदीन बिन अली यांना सत्तेतून बेदखल करण्यात आले. त्यानंतर ट्यूनीशियातील अन्नहद पक्षाने निवडणूक जिंकली. अन्नहद हा एक इस्लाम प्रभावित राजकीय पक्ष आहे. जो मुस्लिम ब्रदरहूडला प्रेरणास्थान मानतो.
२०१२मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुस्लिम ब्रदरहूडने आपला उमेदवार उतरवला. मोहम्मद मुर्सी असे या उमेदवाराचे नाव. मुर्सी यांनी ही निवडणूक जिंकत इजिप्तचे राष्ट्रपतीपद तर मिळवले. पण, अल्पावदीतच इजिप्तच्या लष्कराने मुर्सी यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी तुरूंगात टाकले.
जॉर्डनमध्येही मुस्लिम ब्रदरहूडने निवडणुकांमध्ये सक्रीय भाग घेतला होता. तिथे या संघटनेने इस्लामिक अँक्शन फ्रंड (आएएएफ) नावाचा राजकीय पक्ष जन्माला घातला. पण, पुढे २०१३मध्ये या पक्षानेच मुस्लिम ब्रदरहूडशी आपले नाते तोडून टाकले. आयएएफचे जॉर्डनच्या संसदेत मोठी ताकत होती.
मुस्लिम ब्रदरहूडचा प्रभाव असलेले देश
पॉलेस्टाईनमध्ये हमास, ट्युनीशियात अन्नहद, कुवेतमध्ये इस्लामिक कॉन्स्टिट्यूशनल मुव्हमेंट, बहरीनमध्ये मिनबार आदी नावाने मुस्लिम ब्रदरहूड कार्यरत आहे. तर पाकिस्तान आणि भारतात जमात-ए-एस्लामी नावाची संघटना मुस्लिम ब्रदरहूडपासून प्रेरणा घेऊन बनल्या असल्याचे सांगितले जाते.
मुस्लिम ब्रदरहूड दहशतवादी संघटना म्हणून घोषीत
इजिप्त, रशिया, सौदी अरब, सीरिया, आणि युनायटेड अरब अमीरात या देशांमध्ये मुस्लिम ब्रदरहूडला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषीत करण्यात आले आहे.