भारताची 'मिशन शक्ती' मोहीम 'अतिशय धोकादायक', पाडलेल्या उपग्रहाच्या तुकड्यांचा अंतराळात धोका: नासा
यामध्ये अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडण्याची चाचणी घेण्यात आली, जी यशस्वी ठरली. मात्र याबाबत अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (NASA) भीती व्यक्त केली आहे
नुकतीच भारताची ‘मिशन शक्ती’ (Mission Shakti) मोहीम यशस्वी झाली. यामध्ये अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडण्याची चाचणी घेण्यात आली, जी यशस्वी ठरली. मात्र याबाबत अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (NASA) भीती व्यक्त केली आहे. भारताने हा उपग्रह पाडल्याने त्याचे 400 तुकडे झाले आहेत, जे की अंतराळाच्या कक्षेत तसेच फिरत राहणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) आणि त्यामध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताची ही मोहीम 'अतिशय भयानक' असल्याचे नासाने म्हटले आहे.
भारतीय संरक्षण संशोधन संस्था (DRDO) ने 27 मार्च रोजी अँटी-सॅटेलाइट (A-SAT) क्षेपणास्त्रची चाचणी केली. यामध्ये 300 किलोमीटर दूर पृथ्वीच्या निम्न कक्षामध्ये थेट उपग्रह नष्ट करण्यात भारत यशस्वी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल माहिती दिली होती. या मोहिमेद्वारे भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. आता भारताने पाडलेल्या उपग्रहाच्या अंतराळातील अवशेषाचा मुद्दा उपस्थित करत त्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा: अंतराळातील कचरा ठरतोय नवीन डोकेदुखी)
याबाबत नासा प्रमुख जिम ब्रिडेनस्टाइन (Bridenstine) यांनी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, 'आम्ही भारतीय सॅटेलाइटचे तुकडे ट्रॅक करत आहोत. आतापर्यंत आम्ही 10 सेमी आणि त्याच्यापेक्षा मोठ्या अशा 60 तुकड्यांना ट्रॅक केले आहे. यातील 24 तुकडे हे आयएसएस भोवती फिरत आहेत व ते अतिशय धोकादायक आहेत. ‘
'नासा' अंतराळामध्ये असलेल्या तुकड्यांवरती सतत लक्ष ठेवून असते. यामध्ये आत्तापर्यंत 23 हजार तुकडे अंतराळामध्ये आढऴून आले आहेत. पैकी 10 हजार तुकडे हे 'आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन'चे आहेत. या 10 हजारपैकी 3 हजार तुकडे चीननं 2007 मध्ये केलेल्या 'एन्टी सॅटेलाईट टेस्ट'मुळे तयार झाले आहेत.