Mu Variant: समोर ला Covid-19 चा अजून एक धोकादायक व्हेरिएंट 'म्यू'; 40 हून अधिक देशांमध्ये नोंदवली चार हजार प्रकरणे- WHO
डब्ल्यूएचओ म्हणते की या प्रकाराची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहे.
जगात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव होऊन जवळजवळ दीड वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र ही महामारी संपण्याऐवजी दिवसेंदिवस हा विषाणू अधिक धोकादायक होत आहे. यामागील महत्वाचे कारण म्हणजे, प्रत्येक वेळी व्हायरसचे नवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणखी एका नवीन कोविड प्रकाराचा मागोवा घेणे सुरू केले आहे. या नव्या व्हेरिएंटचे नाव म्यू (Mu B.1.621) असे आहे. हा प्रकार पहिल्यांदा या वर्षी जानेवारीत समोर आला होता. आतापर्यंत जगातील 40 हून अधिक देशांमध्ये या प्रकाराशी संबंधित चार हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
म्यू व्हेरिएंटबद्दल चिंतेची बाब म्हणजे डब्ल्यूएचओच्या मते, हा प्रकार लसीलाही कुचकामी ठरवू शकतो तसेच तो अधिक संसर्गजन्य देखील असू शकते. डब्ल्यूएचओ म्हणते की या प्रकाराची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहे. डब्ल्यूएचओने या प्रकाराला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, म्यू व्हेरिएंट जानेवारी 2021 मध्ये कोलंबियामध्ये दिसला होता. त्यानंतर तो दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पसरला.
सध्या जागतिक पातळीवर, त्याची प्रकरणे कमी झाली आहेत आणि ती 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. डेल्टा व्हेरिएंटसह, म्यू व्हेरिएंटच्या उपस्थितीवरही नजर ठेवली जात आहे. डब्ल्यूएचओने डेल्टा प्रकारांव्यतिरिक्त अल्फा, बीटा आणि गामाला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून सूचीबद्ध केले आहे. म्यू व्यतिरिक्त, आयोटा, कापा आणि लॅम्बडा 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून नोंदवले गेले आहेत. म्यूच्या महत्त्वाच्या उत्परिवर्तनांपैकी एक E484K आहे. यात N501Y म्युटेशनही आहे जे या प्रकाराला अजून संक्रामक बनवू शकते. (हेही वाचा: देशातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती वेळ लागणार? AIIMS Director रणदीप गुलेरिया यांनी दिले 'हे' उत्तर)
दरम्यान, अलीकडेच, कोरोनाचा आणखी एका नवीन प्रकार C.1.2 समोर आला आहे. या व्हेरिएंटबाबतही डब्ल्यूएचओ तपासणी करत आहे. हा प्रकार दक्षिण आफ्रिकेसह इतर अनेक देशांमध्ये आढळला आहे. सध्या तरी हा प्रकार धोकादायक मानला गेला आहे कारण तो, कोविड-19 विरोधी लसीपासून मिळणाऱ्या अँटीबॉडीजवरही मात देत आहे.