धक्कादायक! कोरोना व्हायरस कर्फ्यूमध्ये बाल्कनीमध्ये खेळत होता 13 वर्षांचा मुलगा; पोलिसांनी गोळ्या घालून केली हत्या
यावर एक उपाय म्हणून कर्फ्यू (Curfew) अथवा संचार बंदी हा मार्ग अवलंबला जात आहे. मात्र याबाबत केनिया (Kenya) इथे एक धक्कादायक घटना घडली आहे
सध्या भारतासह जगातील अनेक देश कोरोना व्हायरस (Coronavirus) शी लढत आहेत. यावर एक उपाय म्हणून कर्फ्यू (Curfew) अथवा संचार बंदी हा मार्ग अवलंबला जात आहे. मात्र याबाबत केनिया (Kenya) इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे देशव्यापी कोरोना व्हायरस कर्फ्यू लागू झाल्यानंतर, केनियाच्या पोलिसांनी घराच्या बाल्कनीमध्ये खेळत असलेल्या एका 13 वर्षाच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारले आहे. यासिन मोयो (Yasin Moyo) असे या मुलाचे नाव असून, सोमवारी सायंकाळी 7.20 च्या सुमारास ही घटना घडली.
मानवी हक्क कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा नैरोबी (Nairobi) शेजारील, किमाईकोच्या (Kiamaiko) परिसरात राहत होता. तिथेच त्याच्या पोटात गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International) च्या अॅम्नेस्टी केनिया या शाखेने ट्विटरवर या मृत्यूबाबत पोस्ट लिहिली असून, या म मुलाच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे. (हेही वाचा: 'शक्य असेल तर कृपया आम्हाला मदत करा'; न्यूयॉर्कचे गव्हर्नर Andrew Cuomo यांची वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साद)
त्यानंतर आता केनियाच्या फिर्यादी संचालकांनी मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू पोलिसांच्या चुकून लागलेल्या गोळीतून झाला आहे.' मात्र पोलिसांनी गोळीबार का केला याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, केनियामध्ये केवळ 50 कोरोना व्हायरसच्या घटनांची पुष्टी झाली आहे आणि टेस्ट किटांच्या कमतरतेमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखून त्यावरील नियंत्रणासाठी, इथे गेल्या आठवड्यात शुक्रवारी देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 च्या दरम्यान रहिवाशांना त्यांचे घर सोडण्यास मनाई आहे आणि इतर वेळीही बाहेर जाऊ नका असा सल्ला दिला आहे.