कंगाल पाकिस्तानमध्ये सायबर हल्ला; 10 मोठ्या बँकांच्या सुरक्षेला सुरुंग, करोडो रुपयांची चोरी
पाकिस्तानमध्ये घडलेल्या सायबर हल्ल्यात हॅकर्सनी पाकिस्तानमधील 10 मोठ्या बँकेतील तब्बल 8,000 खातेधारकांची माहिती चोरली गेली आहे
गंभीर आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी एक झटका देणारी गोष्ट घडली आहे. या घटनेमुळे पैशा पैशाला महाग झालेला पाकिस्तान आणि देशाचे पंतप्रधान इमरान खान यांच्या चिंतेत अजूनच वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे पाकिस्तानमधील बँकिंग व्यवस्थाच धोक्यात आली आहे.
पाकिस्तानचे वर्तमानपत्र, ‘द डान’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी हॅकर्सनी बँकांची सुरक्षा व्यवस्था तोडून बँकेचे सर्व्हर हॅक केले आहेत. या गोष्टीचा फटका देशातील सर्व मोठ्या बँकांना बसला असून, या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये अक्षरशः हाहाकार माजला आहे. तपास विभागाने त्यांचा तपास सुरु केला असून, यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
सायबर क्राईम विभागाचे प्रमुख मोहम्मद शोएब यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या जवळ जवळ सर्व बँकांचा डेटा हॅक करण्यात आला आहे, तसेच अनेक खातेधाराकांच्या खात्यातून करोडो रुपयांची चोरी करण्यात आली आहे. मात्र अजूनही नक्की किती रुपयांची चोरी झाली आहे हा आकडा समोर आला नाही. जवळपास 100 पेक्षा अधिक सायबर हल्ल्याच्या घटना समोर आल्या असल्याचे मोहम्मद शोएब यांनी मान्य केले आहे
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हॅकर्सनी पाकिस्तानमधील 10 मोठ्या बँकेतील तब्बल 8,000 खातेधारकांची माहिती चोरली गेली आहे.