Digital Drugs: जाणून घ्या काय आहे डिजिटल ड्रग्ज; दारू, कोकेन, चरस, गांजानंतर नशेसाठी होत आहे खास प्रकारच्या संगीताचा वापर

त्यावेळी तो विज्ञान जगतात आवडीचा विषय बनला होता. यानंतर गेराल्ट ऑस्टर यांनी 1973 मध्ये सायंटिफिक अमेरिकनमध्ये 'ऑडिटरी बीट्स इन द ब्रिटन' नावाचा लेख लिहिला, यामध्ये त्यांनी बायनॉरल बीट्सबद्दल बरीच नवीन माहिती दिली.

headphones | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सध्या ज्या वेगाने जग विविध डिजिटल गोष्टींकडे वाटचाल करत आहे, ते पाहून कधी कधी युवापिढीबाबत चिंता वाटू लागते. रोजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजणच दैनंदिन जीवनातील क्षुल्लक बाबींच्या पलीकडे एक वेगळे, शांत, आत्म-समाधानी जग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक लोक अंमली पदार्थांचा आधार घेतात. परंतु आता या बदलत्या युगात अंमली पदार्थांच्या व्यसनाचा ट्रेंडही बदलला आहे. आजकाल लोक डिजिटल ड्रग्ज (Digital Drugs) घेऊ लागले आहेत. म्हणजेच दारू, कोकेन, भांग, चरस, गांजा आणि एलएसडी यांसारख्या मादक पदार्थांवरही ऑनलाइन पर्याय समोर आला आहे.

तर डिजिटल ड्रग्ज म्हणजे नशेसाठी एका ठराविक प्रकारचे संगीत ऐकणे होय. आम्ही ज्या डिजिटल ड्रग बाबत बोलत आहोत, त्याचे वैज्ञानिक नाव बायनॉरल बीट्स (Binaural Beats) आहे. ही संगीताची एक श्रेणी आहे जी YouTube आणि Spotify सारख्या मीडिया प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नशेसाठी फक्त मोबाइल, हेडफोन आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. असे ऑडिओ ट्रॅक ऐकून लोकांना नशा चढत आहे. या संगीताचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात, ज्याचा मुख्यत्वे मेंदूवर परिणाम होतो.

‘बायनॉरल बीट्स’ ही दोन शब्दांनी बनलेली संकल्पना आहे. यामध्ये बायनॉरल म्हणजे दोन कान आणि बीट्स म्हणजे आवाज. अहवालानुसार, याच्या वाढत्या ट्रेंडनंतर, त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. याबाबत ड्रग अँड अल्कोहोल रिव्ह्यू जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 30 हजार लोकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये 5.7 टक्के लोकांना बायनॉरल बीट्स ऐकायला आवडते असे समोर आले आहे.

संशोधनानुसार, बायनॉरल बीट्स ऐकणाऱ्यांपैकी 60 टक्के पुरुष आहेत. सुमारे तीन चतुर्थांश लोक ते ऐकल्यानंतर चांगल्या प्रकारे झोपतात. त्याच वेळी, सुमारे 34 टक्के लोक मूड बदलण्यासाठी ते ऐकतात आणि सुमारे 11 टक्के लोक इतर ड्रग्जला पर्याय म्हणून ते ऐकतात. अमेरिका, ब्रिटन, मेक्सिको, ब्राझील, पोलंड, रोमानियामध्ये बायनॉरल बीट्स सर्वाधिक ऐकले जात आहेत. सुमारे 50 टक्के लोक ते 1 तास ऐकतात आणि सुमारे 12 टक्के लोक 2 तासांपेक्षा जास्त काळ ते ऐकतात. (हेही वाचा: काय सांगता? धुम्रपान सोडण्यासाठी मिळणार आर्थिक मदत; इंग्लंडच्या Cheshire East शहरात सुरु होत आहे नवी योजना)

दरम्यान, हेनरिक विल्हेल्म डोव्हने 1893 मध्ये बायनॉरल बीट्सचा शोध लावला होता. त्यावेळी तो विज्ञान जगतात आवडीचा विषय बनला होता. यानंतर गेराल्ट ऑस्टर यांनी 1973 मध्ये सायंटिफिक अमेरिकनमध्ये 'ऑडिटरी बीट्स इन द ब्रिटन' नावाचा लेख लिहिला, यामध्ये त्यांनी बायनॉरल बीट्सबद्दल बरीच नवीन माहिती दिली. रिपोर्ट्सनुसार, डिजिटल ड्रगचे पहिले प्रकरण 2010 मध्ये अमेरिकेतील एका शाळेत दिसले होते. या ठिकाणी 3 मुले मद्यधुंद अवस्थेत दिसली होती. मुख्याध्यापकांनी त्यांना विचारले असता त्यांनी आपण बायनॉरल बीट्स ऐकत असल्याचे सांगितले. त्यानंतर नार्कोटिक्स ब्युरोला याबाबत इशारा देण्यात आला.

(लेखात दिलेली  माहिती इंटरनेट आधारीत  असून ती फक्त माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही)