TikTok ची पॅरेंट कंपनी ByteDance चा मोठा निर्णय; भारतामधील व्यवसाय बंद करण्याची घोषणा, अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅप्सची मालकी असलेल्या या कंपनीच्या सेवांवरील निर्बंध कायम आहेत

Tik Tok video app (Photo Credits: Wiki Commons)

नुकतेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) टिकटॉकसह (TikTok) 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर कायमस्वरुपी बंदी (Permanent Ban) घालण्याची नोटीस बजावली. त्यानंतर भारतामध्ये पुन्हा टिकटॉक सुरु होण्याची आशा पूर्णपणे संपली. या गोष्टीची परिणती आता भारतामधील अनेक लोकांच्या नोकऱ्या जाण्यामध्ये होणार आहे. कारण टिकटॉकची मूळ कंपनी Bytedance भारतातील आपले कामकाज कायमचे बंद करत आहे. ज्यामुळे कंपनीने आपल्या टीममधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना 3 महिन्यांचा आगाऊ पगार दिला आहे.

2020 मध्ये जेव्हा भारतात टिकटॉकवर बंदी घातली होती तेव्हापासूनच Bytedance ने भारतामधील आपला व्यवसाय कमी करण्यास सुरुवात केली होती. भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅप्सची मालकी असलेल्या या कंपनीच्या सेवांवरील निर्बंध कायम आहेत. त्यामुळे आता कर्मचार्‍यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, ते आपली टीम कमी करत आहेत. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम भारतातील सर्व कर्मचार्‍यांवर होईल. टिकटॉकला भारतात बंदी घातल्यानंतर, Bytedance काही काळासाठी इंडोनेशिया व इतर ठिकाणांहून भारताचा व्यवसाय हाताळत होते.

ByteDance ने कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही 29 जून, 2020 रोजी जारी केलेल्या भारत सरकारच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काम केले आहे. आमच्या अ‍ॅपने स्थानिक कायद्यांचे आणि नियमांचे पालन करण्याचा सतत प्रयत्न केला आहे आणि ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आता हे निराशाजनक आहे की गेल्या सात महिन्यांतील आमच्या प्रयत्नांना न जुमानता, आमच्या अ‍ॅप्सला पुन्हा परवानगी कशी व कधी दिली जाऊ शकते याबद्दल आम्हाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या नाहीत. म्हणूनच आमच्याकडे आमचा व्यवसाय कमी करण्याशिवाय आणि टीम कमी करण्याशिवाय पर्याय उरला नाही.' (हेही वाचा: भारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी)

दरम्यान, केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर, गेल्या 6 महिन्यांत सरकारने 208 अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली.