भारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी
भारताने सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्टइंडीजला तब्बल 224 धावांनी हरवले आहे
भारताने सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्टइंडीजला तब्बल 224 धावांनी हरवले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने वेस्टइंडीजसमोर 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र वेस्टइंडीजचा संघ 36.2 ओव्हरमध्ये फक्त 153च धावा करू शकला. धावांचा विचार करता वनडेमध्ये हा भारताचा तिसरा मोठा विजय आहे.
या सामन्यात भारताला धावा प्राप्त करून देण्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायडूचे फार मोठे योगदान होते. दोघांनीही शतकी खेळी केली, तर खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रोहितचे वनडे करिअरमधील हे 21वे शतक आहे तर रायडूचे हे 3रे शतक आहे.
विंडीजतर्फे होल्डरने सर्वाधिक म्हणजे 54 धाव केल्या. मात्र संघातील इतर खेळाडू समाधानकारक कामगिरी दाखवू शकले नाहीत. होल्डरनंतर हेमराज(14), मार्लोन सॅम्यूएल्स(18), शिमरॉन हेटमेयर(13), फॅबिएन अॅलेन(10) आणि किमो पॉल(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
भारताकडून रोहितने या सामन्यात 137 चेंडूत 162 धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर अंबाती रायडूने 81 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ एमएस धोनी (23), रविंद्र जडेजा(7) आणि केदार जाधवने(16) भारताला 377 धावांचा टप्पा गाठून दिला.