WI vs ENG 3rd Test: इंग्लंडने 67 धावांत गमावल्या होत्या 7 विकेट, रुट-स्टोक्ससारख्या फलंदाजांच्या अपयशानंतर तळाच्या दोन खेळाडूंनी केली कमाल
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा संपूर्ण संघ 204 धावांत गारद झाला होता. जॅक लीच आणि साकिब महमूद यांच्यातील अखेरच्या विकेटच्या 90 धावांच्या भागीदारीने ब्रिटिश संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले.
WI vs ENG 3rd Test: वेस्ट इंडिज (West Indies) आणि इंग्लंड (England) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना ग्रेनाडा (Grenada) येथे खेळला जात आहे. दोन्ही संघातील मालिकेमधील पहिले दोनही सामने अनिर्णित राहिल्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागण्याची अपेक्षा आहे. या सामन्यात इंग्लंड फलंदाजांची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा संपूर्ण संघ 204 धावांत गारद झाला होता. जॅक लीच (Jack Leech) आणि साकिब महमूद (Saqib Mahmood) यांच्यातील अखेरच्या विकेटच्या 90 धावांच्या भागीदारीने ब्रिटिश संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले. (WI vs ENG 2nd Test: Joe Root याने केन विल्यमसन याला पछाडलं, 25 व्या कसोटी शतकासह इंग्लंड कर्णधाराची कोहली-स्मिथ यांच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल)
यादरम्यान कर्णधार जो रूट, बेन स्टोक्स, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो यांसारखे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. एक वेळ अशी होती की इंग्लिश संघाने 67 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, तेव्हा संपूर्ण संघ 100 धावांतच गारद होईल असे वाटत होते परंतु नंतर शेपटीच्या फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा सामना केला आणि धावसंख्या 200 पार नेली. तिसऱ्या कसोटीत यजमान विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार क्रेग ब्रॅथवेटचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य सिद्ध केला. काइल मेयर्सने 23 धावांवर क्रॉलीच्या रूपाने इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर जणू विकेटकांचे वादळच सुरु झाले ज्यामध्ये स्टोक्स, रुटसह इतर धाकड फलंदाजांचीही तारांबळ उडाली.
तथापि जॅक लीच 31 धावा करून एका टोकाला उभा राहिला आणि दुसऱ्या टोकाला फलंदाज आले व गेले. तथापि, 2019 च्या ऍशेस मालिकेत लीड्स येथे बेन स्टोक्सच्या साथीला शेवटच्या विकेटसाठी तळ ठोकून खेळलेला संस्मरणीय मॅच-विनिंग भागीदारीनंतर जवळजवळ दिग्गजचा दर्जा प्राप्त झालेल्या लीचला साकिब महमूदमध्ये एक तगडा जोडीदार मिळाला आणि या जोडीने आपले नशीब चालवले व जवळपास संपूर्ण अंतिम सत्र खेळून विंडीज गोलंदाजांना परेशान केले. इंग्लंडच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे तर कर्णधार जो रूटला खातेही उघडता आले नाही, तर डॅन लॉरेन्स 8, स्टोक्स 2, बेअरस्टो 0 आणि बेन फ़ॉक्स 7 अशा वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हिलियनमध्ये परतले. यानंतर ख्रिस वोक्स 25, क्रेग ओव्हरटन 14, जॅक लीचने 41 आणि साकिब महमूद याने 49 धावांची ताबडतोड खेळी करून संघाची नौका पार लगावली. लीच आणि महमूद यांच्यात 10व्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली, जी इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील ही 9वी सर्वोच्च भागीदारी आहे.