IPL मध्ये ‘या’ संघाकडून झळकावली गेली सर्वाधिक शतके, तर गेल्या 13 हंगामापासून KKR शतकासाठी आसुसला

गेल्या 14 सीजनमध्ये या संघाकडून तब्ब्ल 14 शतके केली आहेत. तर आयपीएलमध्ये केकेआरने आतापर्यंत 14 हंगामात केवळ एकच शतक झळकावले आहे आणि या बाबतीत हा संघ आठव्या स्थानावर आहे.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

Most Centuries by IPL Teams: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाची 26 मार्चपासून चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलने 10 संघांमध्ये या वेळी संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होणार असून यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ नवीन जोडले गेले आहेत. यावेळी दोन नवीन संघांसोबत विजेतेपदाची लढत आणखी रोमांचक होणार आहे. या हंगामात 10 संघांपैकी कोणता संघ सर्वाधिक शतके झळकावणार हे पाहणे मनोरंजक असेल, परंतु त्यापूर्वी, जुन्या 8 संघांपैकी या लीगमध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक शतके झळकावली आहेत ते जाणून घ्या. सीझन 15 मध्ये एकीकडे KKR चे फलंदाज त्यांचा 13 वर्षांचा शतकाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धारित असतील, दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) त्यांचे वर्चस्व कायम ठेवू पाहत असतील. येथे आम्ही IPL च्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या संघांबद्दल बोलत आहोत. (IPL 2022: ‘या’ खेळाडूचं नशीब फिरले; भारतासाठी दोन विश्वचषक खेळला, 2014 मध्ये IPL ची पर्पल कॅप जिंकणारा खेळाडू बनला नेट बॉलर)

आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक शतके लागवण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या नावे आहे. गेल्या 14 सीजनमध्ये या संघाकडून तब्ब्ल 14 शतके केली आहेत. यामध्ये टीमचा माजी कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक 5 शतके झळकावली आहेत. तर पंजाब किंग्ज सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून या संघाकडून खेळाडूंनी आतापर्यंत 13 शतके केली आहेत. तसेच या बाबतीत दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली संघाने एकूण 10 शतके झळकावली आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या गेल्या 12 हंगामात एकूण 9 शतके झळकावली आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघानेही तेवढीच शतके झळकावली आहेत. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 4, तर सनरायझर्स हैदराबादने तीन शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये केकेआरने (KKR) आतापर्यंत 14 हंगामात केवळ एकच शतक झळकावले आहे आणि या बाबतीत हा संघ आठव्या स्थानावर आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलम याचे झंझावाती शतकाच्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आयपीएलची पहिली आवृत्ती 2008 मध्ये मोसमातील पहिल्याच सामन्यात केकेआर सलामी फलंदाजाने बेंगलोरविरुद्ध 10 चौकार आणि 13 षटकारांसह 158 धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर दोन वेळा चॅम्पियन संघाकडून एकही फलंदाज शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठू शकला नाही.