Pakistan vs England, 1st Test Day 4 Stumps Scorecard: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, हॅरी ब्रूकच्या त्रिशतकामुळे पाकिस्तान पराभवाच्या वाटेवर; विजयापासून इंग्लंड 4 विकेट्स दूर

पाकिस्तान संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 115 धावांनी मागे आहे. पाकिस्तानवर पराभवाची छाया पसरली आहे.

ENG vs PAK (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 07 ऑक्टोबरपासून मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात 37 षटकांत सहा गडी गमावून 152 धावा केल्या आहे. पाकिस्तान संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 115 धावांनी मागे आहे. पाकिस्तानवर पराभवाची छाया पसरली आहे. पाकिस्तानकडून आगा सलमान 41 नाबाद आणि आमेर जमाल 27 धावांवर खेळत आहे. ख्रिस वोक्सने इंग्लंड संघाला पहिले यश मिळवून दिले. इंग्लंडकडून गुस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कारसे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

पाकिस्तानने पहिल्या डावात केल्या 556 धावा

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने पहिल्या डावात 149 षटकात 556 धावा करत पाकिस्तानचा संपूर्ण संघ सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून  कर्णधार शान मसूदने 151 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली, तर सलमान अली आघानेही 104 धावा करत संघाला मजबूत केले. याशिवाय अब्दुल्ला शफीक (102) आणि सौद शकील (82) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून स्टार गोलंदाज जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले. जॅक लीचशिवाय गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कार्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. त्याचबरोबर ख्रिस वोक्स, शोएब बशीर, जो रूट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.

हॅरी ब्रूकने झळकावले त्रिशतक

प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने पहिला डाव 150 षटकांत 7 गडी गमावून 823 धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने संघाकडून सर्वाधिक 317 धावांची खेळी खेळली. हॅरी ब्रूकने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पहिले त्रिशतक पूर्ण केले. हॅरी ब्रूक 322 चेंडूत 29 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 317 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. (हे देखील वाचा: Highest Test Score By Team: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध केल्या 823 धावा, जाणून घ्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वात मोठी धावसंख्या)

जो रूटने झळकावले सहावे द्विशतक

हॅरी ब्रूकशिवाय अनुभवी फलंदाज जो रुट 262 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. जो रूटने कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले. यादरम्यान हॅरी ब्रूक आणि जो रूट या जोडीने चौथ्या विकेटसाठी 454 धावांची विक्रमी भागीदारी केली. इंग्लंडसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. पाकिस्तानकडून सैम अयुब आणि नसीम शाह यांनी पहिल्या डावात प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. सैम अयुब आणि नसीम शाह यांच्याशिवाय शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल आणि आगा सलमानला प्रत्येकी एक विकेट मिळाली.