T20 World Cup 2021: विराट कोहलीचा विश्वचषक रेकॉर्ड ‘जशाच तसा’, अंतिम सामन्यात वॉर्नरही फेल; पहा टी-20 WC मध्ये ‘या’ खेळाडूंनी चोपल्या सर्वाधिक धावा

यंदाच्या जेतेपदाच्या सामन्यात वॉर्नरने मोठा कारनामा करून विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती पण तो अपयशी ठरला आणि अवघ्या काही धावांनी विराटचा विश्वविक्रम बचावला.

डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या एका आवृत्तीत सर्वाधिक धावा (Most Runs in T20 WC Edition) करण्याचा सात वर्ष जुना विश्वविक्रम यंदाही अबाधित राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टी-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) शानदार विजय मिळवला आणि पहिले टी-20 जेतेपद पटकावले. कांगारू संघाच्या या विजयात सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचा (David Warner) मोलाचा वाटा होता. वॉर्नरने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांसह एकूण 53 धावांची खेळी केली. यंदाच्या जेतेपदाच्या सामन्यात वॉर्नरने मोठा कारनामा करून विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती पण तो अपयशी ठरला आणि अवघ्या काही धावांनी विराटचा विश्वविक्रम बचावला. ‘किंग कोहली’ने 2014 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 319 धावा केल्या होत्या. त्यावेळी कोहलीने श्रीलंकेचा माजी दिग्गज तिलकरत्ने दिलशानला मागे टाकले, ज्याने 2009 आवृत्तीत 317 धावा केल्या होत्या. (NZ vs AUS, T20 WC Final: पुन्हा तुटले विल्यमसन आणि संघाचे स्वप्न, ICC नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा; किवींना नमवून बनला टी-20 चा नवा चॅम्पियन)

युएई येथे यंदाच्या आवृत्तीत पाकिस्तानचा स्टार बाबर आजम विराटचा रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ होता. मात्र सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवामुळे त्याची संधी हुकली. बाबर आजमने यंदा विश्वचषकच्या 6 सामन्यात सर्वाधिक 303 धावा चोपल्या. पण तो कोहलीचा ‘विराट’ मोडू शकला नाही. त्यानंतर यंदाच्या आवृत्तीत तिसऱ्या सर्वाधिक धावा करणाऱ्या वॉर्नरकडून अपेक्षा केली जात होती. वॉर्नर विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमापासून 84  धावा दूर होता पण न्यूझीलंडविरुद्ध 53 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे 2014 पासून आतापर्यंत एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यात कोणताही फलंदाज यशस्वी ठरला नाही. वॉर्नरने यंदा 7 टी-20 विश्वचषक सामन्यात 289 धावा केल्या. वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नर गेल्या काही सामन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या साखळी सामन्यात त्याने 89 धावांची खेळी खेळली होती, तर उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध 49 धावांची खेळी केली होती.

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 खेळाडू

बाबर आजम- 303

डेविड वॉर्नर- 289

मोहम्मद रिझवान- 281

जोस बटलर- 269

चरिथ असलंका- 231