RCB vs PBKS IPL 2021 Match 26: राहुलची धमाकेदार खेळी, Harpreet Brar ची दमदार गोलंदाजी; पंजाबने लावला ‘विराटसेने’च्या विजयी घोडदौडवर ब्रेक
पंजाब किंग्सने कर्णधार केएल राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारी ‘विराटसेना’ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 145 धावाच करू शकली परिणामी संघाला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीसाठी विराट कोहलीने 35 धावा केल्या तर रजत पाटीदारने 31 धावांची खेळी केली.
RCB vs PBKS IPL 2021 Match 26: आयपीएलमध्ये (IPL) यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) विजयी घोडदौडवर पंजाब किंग्सने (Punjab Kings) ब्रेक लावला आहे. पंजाब किंग्सने कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) शानदार खेळीच्या जोरावर दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारी ‘विराटसेना’ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 145 धावाच करू शकली परिणामी संघाला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीसाठी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सार्वधिक 35 धावा केल्या तसेच रजत पाटीदारने 31 धावा आणि हर्षल पटेलने 31 धावांची खेळी केली. काईल जेमीसन 16 धावा करून नाबाद परतला. याशिवाय अन्य तडाखेबाज फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाही. दुसरीकडे, पंजाबसाठी फिरकीपटू हरप्रीत ब्रारने (Harpreet Brar) धमाकेदार गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोई 2, रिले मेरीडिथ, मोहम्मद शमी व क्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2021 खेळून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना घरी परतल्यावर भरावा लागू शकतो 50 लाखांचा भारी दंड, वाचा काय आहे नक्की प्रकरण)
पंजाबने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीसाठी विराट-पडिक्क्लची जोडी मैदानात उतरली. पण तिसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीला पहिला धक्का बसला जेव्हा मेरिडिथने देवदत्त पडिक्क्लला क्लीन बोल्ड केलं. यानंतर विराटने पाटीदारसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान, पंजाबचा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने आपल्या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूवर बेंगलोरला मोठे झटके दिले. ब्रारने पहिल्या चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढील चेंंडूवर ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड केलं. विशेष म्हणजे हरप्रीतने ही ओव्हर विकेट मेडन टाकली. विराटने 35 धावा केल्या तर मॅक्सवेल भोपळा न फोडता तंबूत परतला. एबी डिव्हिलियर्स देखील ब्रारच्या फिरकीचा सामना करू शकला नाही व राहुलच्या हाती झेलबाद झाला. पाटीदारला जॉर्डनने निकोलस पुरनच्या हाती आऊट केलं.
यापूर्वी, पहिले फलंदाजी करत पंजाबने कर्णधार राहुलच्या नाबाद 91 धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर 179 धावसंख्या गाठली. राहुल वगळता गेलने 24 चेंडूत 46 धावांची झंझावाती खेळी केली. राहुल-गेलमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी झाली. आपल्या धमाकेदार खेळीदरम्यान गेलने काईल जेमीसनच्या ओव्हरमध्ये 5 चौकार खेचले. सामन्यात पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. पटेलने 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या शिवाय त्याला एकही विकेट काढता आली नाही.