IPL Auction 2025 Live

T-20 World Cup 2007: 12 वर्षापूर्वी आज टीम इंडियाने जिंकले होते पहिले टी-20 विश्वचषक, रोमांचक मॅचमध्ये पाकिस्तान ला केले पराभूत

रोमांचक सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत केले. कर्णधार म्हणून धोनीची ही पहिली परीक्षा होती आणि त्याने ही अव्वल क्रमांकासह पास केली.

टी-20 विश्वचषक (Photo Credit: Getty)

महेंद्र सिंह धोनी कदाचित आज टीम इंडियाचा भाग होऊ शकत नाही, परंतु आजपासून 12 वर्षांपूर्वी, 24 सप्टेंबर 2007 रोजी त्याने टीम इंडियाला पहिला टी-20 विश्वचषक जिंकवून दिला होता. रोमांचक सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) 5 धावांनी पराभूत केले. कर्णधार म्हणून धोनीची ही पहिली परीक्षा होती आणि त्याने ही अव्वल क्रमांकासह पास केली. विश्वचषक 2007 मध्ये झालेल्या पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 च्या पहिल्या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Indian Team) निवड झाली. यात युवा खेळाडूंचा सहभाग होता आणि कोणीही त्यांना विजयाचा  दावेदार मानले नव्हते. पण धोनीच्या संघाने एका मागोमाग एक मॅच जिंकत यश मिळवून अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केले आणि टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला. पण, यानंतर आतापर्यंत टीम इंडियाला पुन्हा असे यश संपादन करता आले नाही. (12 वर्षांपूर्वी जेव्हा युवराज सिंह च्या 6 षटकारांनी हादरले होते डरबन मैदान, आजही कायम आहे 'तो' विक्रम)

भारताच्या गटात स्कॉटलंड आणि पाकिस्तानचे संघ होते. स्कॉटलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तानविरुद्ध सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला आणि बॉल आऊटमध्ये भारताचा विजयी झाला. यासह भारताने सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. इथे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध 10 धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यांचा पुढील सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होता आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही सामने जिंकणे आवश्यक होते. इंग्लंडविरुद्ध युवराज सिंह याच्या आश्चर्यकारक डावाच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. याचा सामन्यात युवीने स्टुअर्ट ब्रॉड यांच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकार ठोकले होते. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहित शर्मा याने अर्धशतकच्या जोरावर भारताने 153 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरपी सिंह याच्या तुफानी गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ कोसळला. सिंहने 4 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 4 विकेट्स घेतले. यासह भारताने विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले.

सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रलिया संघाशी होता. यामध्ये पुन्हा एकदा युवी भारताचा नायक ठरला. युवीने 30 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या आणि यासह ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाने 188 धावांचे लक्ष्य ठेवले. एस श्रीसंथ याच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाई संघ टिकू शकला नाही 7 विकेट्स गमावरून 20 ओव्हरमध्ये 173 धावाच करता आल्या. आणि यासह भारत फायनलमध्ये पोहचला. आयसीसीच्या या स्पर्धेत प्रथमच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने निर्धारित 20  ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 157 धावा केल्या. आरपी सिंह याने पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धीच्या नाकी-नऊ आणले. पाकिस्तानने 77 धावांवर 6 गडी गमावले. यासह भारताचा विजय निश्चित दिसत होता. पण, मिसबाह उल हक याने फलंदाजी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेले. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला जिथे टीम इंडियाला 1 विकेट आणि पाकिस्तानला 13 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर मिसबाहने षटकार मारण्याच्या हेतूने स्कुप शॉट मारला, पण चेंडू सरळ श्रीसंथकडे गेला आणि त्याने तो सहजतेने पकडला. यासह धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला आयसीसी विश्वचषक जिंकला.