NZ vs PAK 2nd Test: केन विल्यमसनचे धमाकेदार दुहेरी शतक, पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत केली विक्रमी कामगिरी
मालिकेच्या दुसर्या सामन्यात क्राइस्टचर्चच्या मैदानावर किवी कर्णधार केन विल्यमसनने दमदार दुहेरी शतक ठोकत विक्रमांची नोंद केली. त्याने सलग तीन सामन्यात शतके खेळली आहेत, तर सलग दुसर्या मालिकेत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे.
NZ vs PAK 2nd Test: न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या दुसर्या सामन्यात क्राइस्टचर्चच्या (Christchurch) मैदानावर किवी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) दमदार दुहेरी शतक ठोकत विक्रमांची नोंद केली. त्याने सलग तीन सामन्यात शतके खेळली आहेत, तर सलग दुसर्या मालिकेत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे. विल्यमसनने 327 चेंडूत आपले चौथे दुहेरी शतक पूर्ण केले. यासह, न्यूझीलंडच्या संघात सर्वात कमी सामन्यांच्या आधारे कसोटी क्रिकेटमध्ये चार दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 71 धावांवर 3 विकेट गमावले असताना विल्यम्सन आणि हेन्री निकोल्स (Henry Nicholls) यांनी चौथ्या विकेटसाठी 369 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला आणि पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच घाम गाळला. पाकिस्तानचा पहिला डाव 297 धावांवर गुंडाळल्यावर किवी फलंदाजांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि धावसंख्या 600 पार नेली. (NZ vs PAK 2nd Test: केन विल्यमसनचा मास्टर स्ट्रोक! न्यूझीलंड कर्णधार 2021 चा ठरला पहिला शतकवीर, टेस्ट मॅचमध्ये झळकावले सलग तिसरे शतक)
संघ मुश्किलीत असताना विल्यम्सनने पुन्हा एकदा पुढाकार घेत मोठी खेळी केली. न्यूझीलंडच्या कसोटीतील चौथ्या विकेटसाठी निकोल्सबरोबरची 369 धावांची सर्वोत्तम भागीदारी करत विल्यमसनने अनेक विक्रम मोडले होते. विल्यम्सनचे कसोटी क्रिकेटमधील हे चौथे दुहेरी शतक ठरले आणि यश त्याने माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमची बरोबरी केली. पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकणार्या विल्यमसनने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. अशाप्रकारे, त्याने मागील तीन सामन्यात दोन दुहेरी शतके आणि शतक झळकावले आहे. पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुहेरी शतकासह विल्यम्सनने 7000 कसोटी धावा देखील पूर्ण केल्या आहेत. शिवाय, न्यूझीलंडकडून कर्णधार म्हणून 3000 टेस्ट रन्स करणारा दुसरा तर घरच्या मैदानात कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा पहिला किवी कर्णधार ठरला.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध यजमान किवी संघाने 659/6 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला आहे. विल्यम्सन वगळता निकोल्सने 157 आणि डॅरेल मिशेलने नाबाद 102 धावा केल्या. काईल जेमीसन नाबाद 30 धावा करून परतला. दुसरीकडे, पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास आणि फहीम अश्रफ यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.