Kieron Pollard Death Hoax: वेस्ट इंडिजचा क्रिकेटर 'कीरोन पोलार्ड'चा कार अपघातामध्ये मृत्यू? जाणून घ्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीमागील सत्य

हा क्रिकेटपटू पूर्णपणे सुरक्षित असून त्याची प्रकृतीही ठीक आहे. ट्वीटरवर आणि काही युट्यूब वाहिन्यांनी आज सकाळी Kieron Pollard चा अपघात होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची बातमी दिली होती

File image of Kieron Pollard (Photo Credits: Getty Images)

सोशल मिडीयाचा वापर वाढल्यापासून लोकांचे जीवन जितके सुखकारक झाले, तितक्याच नवीन समस्याही समोर येत आहेत. सोशल मिडीयाचा एक मोठा तोटा म्हणजे यामुळे अगदी कमी वेळेत खोट्या बातम्या (Fake News) व्हायरल होत राहतात. लोकही बातम्यांची शहानिशा न करता त्या पुढे पाठवत राहतात. सध्या अशीच एक बातमी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ती म्हणजे त्रिनिदादियन क्रिकेटपटू  Kieron Pollard याच्या मृत्यूची बातमी. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार असलेल्या 33 वर्षीय Kieron चा गाडी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी व्हायरल होत आहे.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार Kieron Pollard याच्या मृत्यूची बातमी ही नुसती अफवाच आहे. हा क्रिकेटपटू पूर्णपणे सुरक्षित असून त्याची प्रकृतीही ठीक आहे. ट्वीटरवर आणि काही युट्यूब वाहिन्यांनी आज सकाळी Kieron Pollard चा अपघात होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची बातमी दिली होती. यामध्ये काही युट्यूब वाहिन्यांनी तर एक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून Pollard चा नक्की कसा अपघात झाला याचे चीत्रारंही दर्शवले.

बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र याबाबत थोडा रिसर्च केला असता ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे समोर आले आहे. ट्वीटरही अनेक लोकांनी Pollard च्या मृत्युच्या सत्यतेबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, पोलार्डचा 12 मे 1987 मध्ये झाला. तो वेस्ट इंडीज क्रिकेट संघाशी संबंधित एक आक्रमक खेळाडू आहे. पोलार्ड हा एक अष्टपैलू खेळाडू असून, तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने मध्यम वेगाने गोलंदाजी करतो. सध्या तो अबू धाबीमध्ये टी 10 लीग मध्ये खेळत आहे. (हेही वाचा: सौरव गांगुलीची दुस-यांदा होणार अँजिओप्लास्टी, दोन स्टेंट लावण्यात आल्या)

पोलार्डच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी 104 डावात 26.0 च्या सरासरीने 113 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळताना 2496 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्याशिवाय वेस्ट इंडिजकडून 76 T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळत त्याने 62 डावांमध्ये 25.0 च्या सरासरीने 1226 धावा केल्या आहेत. फलंदाजी व्यतिरिक्त त्याने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून वन डे फॉर्मेटमध्ये 53 आणि  टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 विकेट्स घेतले आहेत.