IPL 2022: आजच्या मॅचमध्ये RCB जिंकल्यास आयपीएल प्लेऑफचं कसं असेल समीकरण? दोन संघांचा होणार पत्ता कट, DC वरही टांगती तलवार

आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. आरसीबीसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे आणि जर आरसीबीने विजय नोंदवला, तर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांची अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून एक्झिट होईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या प्लेऑफची शर्यत खूप मजेदार बनली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. आरसीबी (RCB) साठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे आणि जर आरसीबीने विजय नोंदवला, तर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांची अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून एक्झिट होईल. तथापि, आरसीबीसाठी केवळ सामने जिंकणेच नाही तर त्यांचा नेट रनरेट सुधारणेही महत्त्वाचे आहे. याशिवाय विजयानंतर 21 मे रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालावरही आरसीबीला लक्ष ठवून राहावे लागणार आहे. (IPL 2022 Points Table Updated: रोमहर्षक विजयासह लखनऊच्या खिशात PlayOff चे तिकीट, 2 धावांनी पराभूत होऊन कोलकात्याच्या खेळ खल्लास)

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे 20 आणि 18 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या खात्यात 16 गुण आहेत, तर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी 14 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जच्या खात्यात सध्या प्रत्येकी 12 गुण आहेत आणि दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. जरी दोन्ही संघांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकला तरी त्यांचे एकूण गुण 16-16 पॉईंट होतील. तसेच जर RCB हा सामना जिंकला तर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज अधिकृतपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. तर चौथ्या स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात लढत होईल.

दुसरीकडे, लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीचे 14-14 गुण असले तरी, परंतु नेट रनरेटच्या बाबतीत ऋषभ पंतचा दिल्लीचा संघ खूप पुढे आहे. अशा परिस्थितीत जर आज आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवला आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही मुंबई इंडियन्सला हरवले तर दिल्लीची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.