IPL 2022, MI vs RR Match 9: जोस बटलर याची बॅट तळपली, मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई करून उभारले विक्रमांची मनोरे

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये शतकी पल्ला गाठणारा बटलर पहिला खेळाडू आहे. बटलर आज मुंबईविरुद्ध कारकिर्दीतील 300 वा टी-20 सामना खेळत आहे. बटलर हा राजस्थानचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आपल्या दुसऱ्या आयपीएल शतकी खेळीसह बटलरने विक्रमांचे मनोरे उभारले.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) दणदणीत शतक ठोकले आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये शतकी पल्ला गाठणारा बटलर पहिला खेळाडू आहे. या सामन्यात जोस बटलरने आणखी एक मोठा कारनामा केला आहे. त्याने आयपीएलमध्ये (IPL) 200 चौकार मारण्याचा विक्रमही आपल्या नवे केला आहे. बटलरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स 193 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे. राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या पाच विकेट शेवटच्या दोन षटकांत पडल्या. जसप्रीत बुमराह याच्या शेवटच्या षटकांत मुंबईने तीन विकेट्स काढल्या. (IPL 2022, MI vs RR Match 9: जोस बटलर याचे वादळी शतक, हेटमायरने मुंबईच्या गोलंदाजांना फोडलाय घाम; राजस्थानने दिले 194 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य)

बटलर आज मुंबईविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 300 वा टी-20 सामना खेळत आहे. बटलर हा राजस्थानचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 150 च्या वर आहे. आयपीएलच्या नवव्या सामन्यात बटलरने मुंबईच्या गोलंदाजांना धारेवर धरलं आणि त्यांची जोरदार धुलाई केली. या सामन्यात बसिल थंपी मुंबईसाठी सर्वात महागडा ठरला. त्याने केवळ एका षटकात 26 धावा लुटल्या. यशस्वी जयस्वालच्या रूपाने पहिली विकेट पडल्यानंतर बटलरने डावाच्या चौथ्या षटकात सलग 5 चौकार लगावत एकूण 26 धावा काढल्या. यादरम्यान बटलरने 101 मीटर लांब षटकारही खेचला. बटलरने अनेक शानदार फटके मारून संघाला धावसंख्या उंचावण्यास मदत केली. थंपीच्या षटकातील पहिल्या चेंडूवर राजस्थानला धाव मिळाली नाही, त्यानंतर बटलरने पुढच्या पाच चेंडूंवर (4, 6, 6, 4, 6) शानदार शॉट मारत जोरदार धावा लुटल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध जॉस बटलरची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याच्या मागील पाच डावांवर नजर टाकली तर या काळात त्याने चार अर्धशतके झळकावली आहेत.

मात्र, जोस बटलरने शतक झळकावल्यानंतर त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला आहे. आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा तो पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएलमधील सर्वात संथ शतकाचा विक्रम मनीष पांडे याच्या नावावर आहे. पांडेने 67 चेंडूत शतक ठोकले होते. याशिवाय टूर्नामेंटच्या इतिहासात दोन शतके करणारा तो दुसरा इंग्लिश खेळाडू बनला आहे. यापूर्वी बेन स्टोक्स याने आयपीएलमध्ये दोन शतके केली आहे. एकूणच तो स्टोक्स, केविन पीटरसन आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासोबत आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या चार इंग्लिश खेळाडूंपैकी एक आहे.