IPL 2022, MI vs RCB: चेन्नई पाठोपाठ मुंबई इंडियन्स संघाचा पराभवाचा ‘चौकार’; बेंगलोरने 7 विकेट्सनी केलं चितपट, अनुज रावतने केले 66 रन्स
आयपीएलच्या 15 हंगामात खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे आरसीबी संघाने या हंगामातील तिसऱ्या विजयाची चव चाखली आहे.
IPL 2022, MI vs RCB: पाच वेळा आयपीएलचे माजी विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या (IPL) 15 हंगामात खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वातील हा बलाढ्य संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. शनिवारी डबल-हेडरच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे आरसीबी संघाने या हंगामातील तिसऱ्या विजयाची चव चाखली आहे. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर अनुज रावत (Anuj Rawat) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे बेंगलोरने 9 चेंडू शिल्लक राखून 152 धावांचे लक्ष्य पार केले. (IPL 2022: लाईव्ह सामन्यात Rohit Sharma याच्याशी गळाभेट करण्यासाठी चाहता मैदानात घुसला, पाहून Virat Kohli च्या चेहऱ्यावर हसू फुटले; पाहा व्हिडिओ)
पुणेच्या MCA स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात मुंबईने पहिले फलंदाजी करून सूर्यकुमार यादवच्या 68 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 गडी गमावून 151 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार शिवाय मुंबईचे दोन फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशन यांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला. रोहित आणि ईशानने प्रत्येकी 26 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात माफक धावसंख्येचा पाठलाग करताना बेंगलोर संघाने 50 धावांवर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि 130 धावांवर रावत याची विकेट गमावली. अनुज रावत एकीकडे आक्रमक फलंदाजी करत असताना कर्णधार डु प्लेसिसने सावध फलंदाजी करताना दिसला. डु प्लेसिस 24 चेंडूत 16 धावा काढून बाद झाला. यानंतर रावतने विराट कोहलीच्या साथीने धावांचा वेग वाढवत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. दोघांनी संघाला तिसरा विजय मिळवून देण्याच्या दिशेने फटकेबाजी सुरू केली. रावतने आपल्या 66 धावांच्या खेळीत 47 चेंडूचा सामना करत 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले. तर विराटने 36 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या.
अशा परिस्थितीत आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई संघाने चेन्नईच्या पावलावर पाऊल ठेवून विजयाचा चौकार मारला. यापूर्वी दिवसाच्या पहिल्या सामन्यात चेन्नईला चौथ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. तथापि प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. गोलंदाज आणि अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे हैदराबादने 8 गडी राखून पहिल्या विजयाची चव चाखली.