IPL 2022, MI vs LSG: प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडली मुंबई इंडियन्स आता बिघडवणार बाकीच्या संघांचे समीकरण! लखनौविरुद्ध खंडित करणार पराभवाचा सिलसिला?

तब्ब्ल 1083 दिवसानंतर मुंबई इंडियन्स संघाने वानखेडेवर ‘होमकमिंग’ होणार आहे. मुंबई संघाने यंदा प्लेऑफ फेरी गाठण्याची शक्यता कमी असताना जर संघ येथून सर्व सामने जिंकला तर अन्य संघाचे गणित नक्कीच बिघडवेल.

रोहित शर्मा आणि केएल राहुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG: आयपीएलच्या प्लेऑफ (IPL Playoffs) शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर आज आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) आव्हान आहे. तब्ब्ल 1083 दिवसानंतर मुंबई इंडियन्स संघाने वानखेडेवर (Wankhede) ‘होमकमिंग’ होणार आहे. या मोसमात मुंबईने आतापर्यंतचे सातही सामने गमावले आहेत. पाच वेळा आयपीएलचे माजी चॅम्पियनसाठी आतापर्यंत काहीही खरे नाही आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी विराजमान आहेत. त्यामुळे आता केवळ चमत्कारच त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचवू शकेल. मुंबई संघाने यंदा प्लेऑफ फेरी गाठण्याची शक्यता कमी असताना जर संघ येथून सर्व सामने जिंकला तर अन्य संघाचे गणित नक्कीच बिघडवेल. अशा परिस्थितीत त्यांचे लक्ष्य लखनौपासून सुरु करण्याचे असेल. (IPL 2022: लिलावात ‘या’ 3 खेळाडूंकडे दुर्लक्ष करून मुंबई इंडियन्सचा डाव फसला, नाहीतर एवकी वाईट अवस्था कधीच झाली नसती)

रोहित शर्माची मुंबई आणि केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ यंदा दुसऱ्यांदा स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. लखनौने पहिल्या लेगच्या सामन्यात मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता, जेणेकरून ते आता मनोबल वाढवून मैदानात उतरतील. लखनौ संघ सध्या चांगल्या स्थितीत दिसत आहे. त्यांनी सातपैकी चार सामने जिंकले आहेत. तथापि गेल्या सामन्यात त्याना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 18 धावांनी पराभवाचा आस्वाद घ्यावा लागला होता. मुंबईने तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु संघ म्हणून खेळण्यात त्यांच्या पदरी अपयश आले आहे. त्यामुळे मुंबई एका सत्रात सात सामने गमावणार पहिला संघ बनला आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही नक्की चूक कोठे होत आहे हे समजत नसल्याचं दिसत आहे. लक्षणीय आहे की मुंबईने विजयाच्या जवळ येऊन यंदा अनेक सामने गमावले आहेत.

मुंबईच्या खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा खराब फॉर्म आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मधल्या फळीत काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत, तर युवा डेवाल्ड ब्रेविसनेही काही सामन्यांत चमक दाखवली पण त्याच्याकडे संयमाचा अभाव दिसला. अष्टपैलू किरॉन पोलार्डने आतापर्यंत केवळ 96 धावा करून संघाच्या अपेक्षा पूर्ण भंग केल्या आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर मुंबईची मुख्य मदार जसप्रीत बुमराहवर असून अन्य गोलंदाजांप्रमाणे तो देखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाहीत. त्यामुळे मुंबई संघाचं घर मानल्या जाणाऱ्या वानखेडेवर तरी खेळाडू पराभवाचा हा सिलसिला मोडण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.