IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावात ‘या’ सलामीवीरांवर असणार मुंबई इंडियन्सची नजर, बनू शकतात रोहित शर्माचे ओपनिंग पार्टनर
पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सच्या यावेळीच्या संघ नियोजनावर सर्वांची नजर असणार आहे. मुंबईकडे आधीच सलामीवीर, एक कर्णधार, एक फिनिशर आणि एक वेगवान गोलंदाज आहे. पण रोहित शर्मासोबत सलामीला उतरणारा साजेसा सलामी फलंदाज निवडण्यासाठी फ्रँचायझीची लिलावात खालील खेळाडूंवर नजर असेल.
IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव आता काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित केला जाईल. पाच वेळा आयपीएल (IPL) विजेते मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) यावेळीच्या संघ नियोजनावर सर्वांची नजर असणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) मुंबईने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), किरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले तर अन्य खेळाडूंची साथ सोडली. मेगा लिलावात मुंबईला प्रथम लेगस्पिनर आणि यष्टिरक्षक फलंदाज खरेदी करण्यावर भर देईल. अशा परिस्थितीत संघ राहुल चाहर आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) किंवा ईशान किशनचा (Ishan Kishan) पुन्हा ताफ्यात समावेश करू शकतात. याशिवाय फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाज खरेदी करण्यावरही मुंबईचा भर असेल. (IPL 2022 Mega Auction: दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ धुरंदर ओपनर साठी फ्रँचायझींमध्ये होऊ शकते रस्सी-खेच, पाण्यासारखा पैसा खर्च उधळतील)
मुंबईकडे आधीच सलामीवीर, एक कर्णधार, एक फिनिशर आणि एक वेगवान गोलंदाज आहे. पण रोहित शर्मासोबत सलामीला उतरणारा साजेसा सलामी फलंदाज निवडण्यासाठी फ्रँचायझीची लिलावात खालील खेळाडूंवर नजर असेल.
क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)
दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या जोडीने यापूर्वी मुंबई इंडियन्सना अनेक सामना जिंकून देणारी भागीदारी केली आहे. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे अनेक संघांची नजर यावेळी डी कॉकवर असेल. डी कॉक आणि रोहितची जोडी पुन्हा जमवण्यासाठी मुंबई इंडियन्स मोठी रक्कम खर्च करू शकते. डी कॉकची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan)
टीम इंडियाचा तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन गेल्या काही मोसमात आयपीएलमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी आहे. धवन यापूर्वी 2009 मध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य होता पण तेव्हा त्याला अधिक संधी मिळाली नाही. मुंबई फ्रँचायझीने यावर्षी धवनवर बोली लावल्यास त्यांना अधिक फायदा पोहचू शकतो. धवन आणि रोहितच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. अशा परिस्थितीत धवनला पुन्हा रोहितचा जोडीदार बनवण्यासाठी मुंबईचा संघ नक्कीच विचार करू शकतो.
ईशान किशन (Ishan Kishan)
सनरायझर्स हैदराबाद विरोधात आयपीएल 2021 च्या आपल्या अंतिम लीग सामन्यात ईशान किशन रोहित शर्मासोबत सलामीला उतरला आणि पहिल्याच चेंडूपासून विरोधी संघाच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली. किशन देखील यापूर्वी अनेक वर्षांपासून मुंबई संघाचा सदस्य होता, पण लिलावापूर्वी त्याला रिलीज केले. किशन आयपीएल 2021 मध्ये खराब फॉर्मशी झुंज देत होता, परंतु त्याने शेवटच्या काही डावांमध्ये शानदार फलंदाजी केली. मात्र, दोन कोटींची मूळ किंमत असलेल्या किशनने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली आहे. अशा स्थितीत त्यांच्यावरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)
सनरायझर्स हैदराबादचा माजी सलामीवीर जॉनी बेअरस्टोनेही आयपीएलमध्ये भरपूर धावा लुटल्या आहेत. 2021-2022 अॅशेस मालिकेत इंग्लंडसाठी पहिले शतक झळकावणाऱ्या या फलंदाजासाठी मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते. त्याची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये आहे. बेअरस्टो हा स्फोटक सलामीवीर तसेच यष्टिरक्षक आहे, जो मुंबईच्या दोन महत्त्वाच्या गरजा पूर्ण करेल. तसेच बेअरस्टो इंग्लंडसाठी मधल्या फळीत फलंदाजी करत असल्यामुळे तो फलंदाजी क्रमात खेळी देखील गरज पडल्यास फलंदाजीला उतरू शकतो.