IPL 2022: रोहित शर्मा याच्या डावपेचांवर माजी प्रशिक्षकाने उचलले बोट, जसप्रीत बुमराह वरही केली मोठी टिप्पणी

तसेच शास्त्री यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IPL 2022: आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामाची सुरुवात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) सलग तीन पराभवाने केली आहे. दिल्ली, राजस्थान आणि कोलकाताकडून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई संघाला विजयाच्या जवळ येऊन पराभवाचे तोंड पाहणे भाग पडले आहे. यादरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी बुधवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून  (Kolkata Knight Riders) झालेल्या पराभवाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) नेहमी डेथ ओव्हर्ससाठी सांभाळून ठेवू नये. मुंबई इंडियन्सच्या, गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी गोलंदाजी आक्रमणात डेप्थ नसल्याचे निदर्शनास आणून दिले. (IPL 2022, MI vs KKR Match 14: मुंबई इंडियन्सचं नक्की कुठे बिनसलं? तीन पराभवानंतर रोहितच्या पलटनची ‘ही’ कमजोर बाजू आली समोर)

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांचा सलग तिसरा सामना जोरदार पद्धतीने गमावला. डॅनियल सॅम्सने एका षटकात 35 धावा दिल्या, आणि पॅट कमिन्सने जोरदार फटकेबाजी करून 5 गडी राखून सामना केकेआरच्या झोळीत पाडला. मुंबई इंडियन्स यंदाच्या मोसमात गोलंदाजीच्या बाबतीत संघर्ष करत आहे, स्लॉग ओव्हर्समध्ये धावा देत आहेत. KKR विरुद्धच्या सामन्यानंतर माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी निदर्शनास आणले की बुमराहचा वापर मुंबई इंडियन्ससाठी एक समस्या बनली आहे.  “मला वाटते बुमराहचा वापर अधिक चांगला झाला पाहिजे. काहीवेळा तुम्ही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेत नाही कारण तुमच्या गोलंदाजीत सखोलता नसते. त्यामुळे विकेट शोधण्याऐवजी तुम्ही त्याला फक्त एक किंवा दोन खेळाडूंसाठी ठेवा किंवा डेथसाठी (स्लॉग ओव्हर्स),” त्यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले.

याशिवाय शास्त्री म्हणाले की, बुमराहचा वापर स्लॉग ओव्हर्सच्या ऐवजी खेळाच्या महत्त्वाच्या काळात केला पाहिजे जेणेकरून मुंबई इंडियन्सला काही लवकर विकेट मिळतील. “बुमराहला अधिक चांगले वापरावे लागेल, आक्रमणाचे पर्याय अधिक चांगले वापरावे लागतील, आपण त्यांना डावाच्या शेवटपर्यंत ठेवू शकत नाही कारण एक किंवा दोन मोठे हिटर संघात आहेत. तुम्‍हाला त्‍यांना लवकर बाद करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता आहे, प्रतिपक्षावर गंभीर दबाव आणण्‍यासाठी काही लवकर विकेट मिळवण्‍याचा प्रयत्‍न करायचा आहे. पहिल्या सहा षटकांमध्ये जेव्हा चिकट ट्रॅक असतो, स्पॉन्जी बाउन्स असतो, तेव्हा तेथे उसळी येते. तुम्ही प्रयत्न करू शकता आणि जास्त नाही तर किमान तीन विकेट्स काढू शकता.”