IPL 2022 CSK vs MI: ‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी...’ रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईला 5 विकेट्सने लोळवलं, PlayOff शर्यतीत सुपर किंग्सचा ‘गेम ओव्हर’!

मुंबईने जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर सीएसके संघाला 97 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात ‘पलटन’ने रोमांचक सामन्यात 14.5 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवून चेन्नईच्या आशेवर पाणी फेरले आणि प्लेऑफ खेळण्याची आस मोडली.

तिलक वर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022 CSK vs MI: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला 5 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. मुंबईने जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर सीएसके (CSK) संघाला 16 ओव्हरमध्ये अवघ्या 97 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात रोहितच्या ‘पलटन’ने 14.5 षटकांत 5 गडी राखून यंदा वानखेडे स्टेडियम आणि हंगामातील तिसरा विजय खिशात घातला. तिलक वर्मा आणि हृतिक शोकीन यांनी संयमाने फलंदाजी करून करून चेन्नईला पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. तिलक वर्मा (Tilak Varma) सर्वाधिक 34 धावा करून नाबाद परतला. तर रोहित शर्मा आणि हृतिकने प्रत्येकी 18 धावा केल्या. तसेच टिम डेविड 16 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, सीएसकेसाठी मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) सर्वाधिक तीन तर, सिमरजीत सिंहने एक विकेट घेत विजयासाठी मुंबईच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पण अखेरीस दोघांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. (IPL 2022, CSK vs MI: डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा पायचीत Out; वानखेडे स्टेडियमवर ‘या’ कारणामुळे चेन्नई फलंदाजांना नाही घेता आला DRS रिव्यू)

दरम्यान, आयपीएल प्लेऑफच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना ‘करो या मरो’चा होता. धोनीच्या सुपर किंग्सला अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे होते. पण मुंबईने रोमांचक सामन्यात विजय मिळवून चेन्नईच्या आशेवर पाणी फेरले आणि प्लेऑफ खेळण्याची आस मोडली. सीएसकेने दिलेल्या 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी देखील गडगडली आणि टीमने अवघ्या 33 धावांत चार विकेट गमावल्या. ईशान किशन फक्त 6 धावाच करू शकला. तर रोहित शर्मा, डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्स झटपट बाद झाले, ज्यामुळे संधी अडचणीत सापडला. तथापि तिलक वर्मा आणि हृतिक शोकीनच्या जोडीने संयमाने सीएसकेच्या गोलंदाजांचा सामना केला व मुंबई इंडियन्सचे कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईच्या प्लेऑफखेळण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.

यापूर्वी टॉस जिंकून मुंबईने चेन्नईला पहिले फलंदाजीला बोलावले. अशा परिस्थितीत मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. चेन्नईकडून कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सकडून सॅम्सने तीन, रिले मेरेडिथ आणि कार्तिकेय सिंहने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चेन्नईचे फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खाते न उघडता बाद झाले. मात्र, गोलंदाजांनी सीएसकेला विजय मिळवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यात सुपर किंग्स अपयशी ठरले. परिणामी चेन्नईचे प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे.