IPL 2021 मध्ये ‘या’ 5 युवा खेळाडूंनी केली धमाल, लवकरच ठोठावतील भारतीय संघाचे दार
आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापूर्वी यावर्षी एकूण 29 सामने खेळले गेले होते. यावेळी अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी/गोलंदाजीने चाहते व दिग्ग्जनाही प्रभावित केले.
IPL 2021: देशातील वाढत्या कोरोना व्हायरस महामारीमुळे (Coronavirus Pandemic) इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा सीझन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आयपीएल (IPL) 2021 पुढे ढकलण्यापूर्वी यावर्षी एकूण 29 सामने खेळले गेले होते. यावेळी अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी/गोलंदाजीने चाहते व दिग्ग्जनाही प्रभावित केले. अशा परिस्थितीत, आयपीएल 2021 च्या 29 सामन्यांनंतर, देशातील पाच युवा खेळाडूंविषयी चर्चा करूया जे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लवकरच टीम इंडियाचे दार ठोठावू शकतात अशा पाच युवा क्रिकेटपटूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (T20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 खेळाडूंना टीम इंडियामध्ये मिळू शकते कमबॅक वा पदार्पणाची संधी, IPL 2021 मध्ये केली ताबडतोड कामगिरी)
देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)
कर्नाटकचा 20 वर्षीय युवा खेळाडू देवदत्त पडिक्क्लनेही यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने आपल्या आरसीबी संघासाठी सहा सामन्यात 39.00 च्या सरासरीने 195 धावा केल्या. पडिक्क्लने यादरम्यान एक शतक देखील ठोकले. अशा परिस्थितीत या धुरंदर खेळाडूची शानदार कामगिरी पाहिल्यानंतर तो लवकरच टीम इंडियाचे दार ठोठावेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
या यादीतील दुसरे नाव चेन्नई सुपर किंग्जचा 24 वर्षीय युवा सलामीवीर रुतूराज गायकवाडचे आहे. गायकवाडने आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापूर्वी सात सामन्यात 28.00 च्या सरासरीने 196 धावा केल्या. यावेळी, त्याच्या बॅटमधून अनेक नेत्रदीपक शॉट्स बाहेर पडले, जे पाहून लोक उत्साही झाले. गायकवाडच्या शानदार फलंदाजीच्या कामगिरीकडे पाहता तो आता लवकर टीम इंडियाकडून खेळताना दिसेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
शाहरुख खान (Shahrukh Khan)
पंजाब किंग्जच्या मधल्या फळीतील 25 वर्षीय शाहरुख खानने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापूर्वी खानने पंजाबसाठी अनेक उपयुक्त खेळी केली आहे. अशा परिस्थितीत त्याची मैदानावरील कामगिरी कायम राहिल्यास तो लवकरच टीम इंडियाकडून खेळतानाही दिसू शकेल.
हरप्रीत ब्रार (Harpreet Brar)
या यादीतील चौथे नाव पंजाब किंग्जचा 25 वर्षीय युवा अष्टपैलू हरप्रीत ब्रारचे आहे. आरसीबीविरुद्ध अष्टपैलू कामगिरीने ब्रारने सर्वांची मने जिंकली आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट क्षेत्रातील ब्रारची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिल्यास क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास असेल तर तो लवकरच टीम इंडियामध्ये आपली उपस्थिती नोंदवू शकतो.
चेतन सकारिया (Chetan Sakariya)
राजस्थान रॉयल्सचा 22 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया या यादीत पाचवा युवा खेळाडू आहे. सकारियाने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून सात सामने खेळले आणि 31.71 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत. सकारिया क्रिकेटच्या मैदानात विरोधी फलंदाजांसमोर ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करीत आहे, ते पाहून आगामी काळात आता टीम इंडियाकडून खेळण्याचा दावा ठोकू शकतो.