एशिया कप २०१८: भारत-अफगाणिस्तान आमनेसामने
भारत आता पर्यंत एशिया कपमध्ये एकही सामना हरला नसून अफगाणिस्तान २ सामने हरला आहे.
एशिया कपच्या आजच्या सुपर ४ च्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने येत आहेत. दुबईमध्ये हा सामना सायंकाळी ५ वाजता रंगणार आहे. एशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आधीच पोहोचला आहे.तर, दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान ह्या आधीच टूर्नामेंटमधून बाहेर गेला आहे. त्यामुळं आजचा सामना वरवर पाहता फारसा महत्त्वाचा नसला तरी, क्रिकेट रसिकांसाठी निखळ आनंद देणारा असेल.
भारताने या आधीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. विशेष असे की, आशिया कपच्या या टूर्नामेंटमध्ये भारत आतापर्यंत एकही सामना हरला नाही. तर, अफगाणिस्तान २ सामने हरला आहे. भारतासाठी आज मनीष पांडे, K.L. राहुल, दीपक चहार, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद ह्या खेळाडूंना संधी मिळू शकेल. अफगाणिस्तानसाठी फिरकीपट्टू रशीद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी महत्वाची भूमिका निभावू शकतात.
आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर अफगाणिस्तानला पाकिस्तान आणि बांगलादेशने खूप कमी फरकाने पराभव केला म्हणूनच भारताला अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही. भारत आणि अफगाणिस्तान ह्या आधी २०१४ ला पहिल्यांदा भेटले होते. त्यात भारताचा विजय झाला होता.