IND Beat ZIM: टी-20 क्रिकेटमध्ये भारताने रचला इतिहास, दुसऱ्यांदा सामना 10 गडी राखून जिंकला
एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
IND vs ZIM 4th T20I: चौथ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव (IND Beat ZIM) केला आहे. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना टीम इंडियाची सलामीची भागीदारी तोडता आली नाही. एकीकडे यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) 39 चेंडूत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रथम खेळताना झिम्बाब्वेने स्कोअरबोर्डवर 152 धावा केल्या होत्या आणि भारताने 28 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: Ricky Ponting ने Delhi Capitals ला केला रामराम, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा)
जैस्वाल आणि गिलची उत्कृष्ट फलंदाजी
यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकापासूनच तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. जैस्वालने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते, मात्र कमी धावांचा पाठलाग केल्यामुळे त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. दुसरीकडे, गिलने 35 चेंडूत अर्धशतक केले. जैस्वालने 53 चेंडूत 93 धावा करताना 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तर कर्णधार गिलने 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 58 धावांची खेळी केली. अखेर 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जैस्वालने चौकाराच्या रुपात टीम इंडियाला विजयी शॉट लगावला.
भारताने दुसऱ्यांदा सामना 10 गडी राखून जिंकला
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक संघांनी 10 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आहे. भारताने 2016 मध्ये पहिल्यांदा असे केले आणि तेव्हाही त्याचा सामना फक्त झिम्बाब्वेशी होता. तो सामनाही हरारे येथे खेळला गेला होता आणि झिम्बाब्वेने प्रथम खेळताना 99 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुल आणि मनदीप सिंग या सलामीच्या जोडीने भारताला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्या सामन्यात मनदीपने 40 चेंडूत 52 धावा आणि राहुलने 40 चेंडूत 47 धावा करत टीम इंडियाचा 10 गडी राखून विजय निश्चित केला. आता शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताला दुसऱ्यांदा टी-20 सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवून दिला आहे.