IND vs ENG: इंग्लंडमध्ये Ajinkya Rahane चा फ्लॉप शो सुरूच, ‘या’ 2 फलंदाजांसाठी खुले होऊ शकते कसोटी संघाचे दार

रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी खेळाडू असला तरी संघ व्यवस्थापन त्याच्या जागी इतर क्रिकेटपटूंना आजमावून पाहू शकते. रहाणेचा खराब फॉर्म दोन खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दार उघडू शकते.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/BCCI)

भारतीय कसोटी संघाचा (Indian Team) उपकर्णधार अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) गेल्या काही वर्षापासून संघासाठी मध्य क्रमातील महत्त्वाचा भाग बनला आहे. रहाणेने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे कर्णधारपद सांभाळत भारताला शानदार ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. पण या मालिकेत मेलबर्न कसोटीतील एक शतक सोडले तर त्याचे प्रदर्शन काही खास राहिले नव्हते. त्यांनतर इंग्लंडविरुद्ध (England) घरेलू मालिकेत देखील रहाणे चार सामन्यात केवळ एक अर्धशतकासह 112 धावाच करू शकला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात त्याने पहिल्या डावात 49 धावा केल्या होत्या. पण दुसर्‍या डावात मात्र तो लवकरच बाद झाला होता. त्यानंतर सध्या इंग्लंड दौऱ्यावर रहाणे तसेच भारताच्या मधल्या फळीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. (IND vs ENG 4th Test Day 4: अजिंक्य रहाणेच्या अपयशाची मालिका कायम, ओव्हलवर भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतला)

रहाणेने लॉर्ड्सवर 61 धावांचे एकमवे अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर त्याने अनुक्रमे 18, 10, 14 0 अशा धावा केल्या होत्या. रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी खेळाडू असला तरी संघ व्यवस्थापन त्याच्या जागी इतर क्रिकेटपटूंना आजमावून पाहू शकते. रहाणेचा खराब फॉर्म दोन खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दार उघडू शकते.

1. हनुमा विहारी

विहारीला पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्याच्या कसोटी कारकिर्दीत 12 कसोटी सामन्यात 30.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. विहारीचे आकडे साधारण असले तरीही त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. 2018 मध्ये त्याने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट अर्धशतक केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील त्याने सिडनी टेस्ट सामन्यात दुखापत असूनही फलंदाजी केली आणि भारतासाठी सामना अनिर्णित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. अशास्थितीत रहाणे इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरला आहे त्यामुळे विहारीला मध्यक्रमात संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

2. सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवला घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार खेळीचे फळ यंदा त्याला इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध मिळाले. सूर्याने टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात जोरदार प्रदर्शन करत चाहत्यांसह तज्ञांचे लक्ष वेधले. त्यानंतर यादवला कव्हर म्हणून इंग्लंड दौऱ्यावर कसोटी खेळण्यास बोलावले पण त्याला अद्याप संधी मिळाली नाही. 77 लाल बॉल सामन्यांप्रमाणे सूर्यकुमारने 44 पेक्षा अधिकच्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 14 शतके आणि 26 अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्याकडे उत्तम आक्रमण आणि बचाव कौशल्य आहे व तो कसोटी संघात रहाणेची जागा घेण्याच्या प्रमुख दावेदार बनू शकतो.