IND vs ENG 4th Test Day 1: अक्षर पटेलने बिघडवली इंग्लंडची सुरुवात; लंचपर्यंत इंग्लिश टीम 3 बाद 74 धावा, स्टोक्स-बेअरस्टो यांच्यावर मदार
चौथ्या अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लिश टीमने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली, डोम सिब्ली आणि कर्णधार जो रूट पहिल्या सत्रात स्वस्तात बाद झाले.
IND vs ENG 4th Test Day 1: अहमदाबादमध्ये भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली असून यजमान संघाने पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवलं आहे. चौथ्या अहमदाबाद टेस्टच्या (Ahmedabad Test) पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लिश टीमने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली, डोम सिब्ली आणि कर्णधार जो रूट पहिल्या सत्रात स्वस्तात बाद झाल्यावर आता जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) जोडीवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी असेल. लंचची घोषणा झाली तेव्हा बेअरस्टो 28 धावा आणि स्टोक्स 24 धावा करून खेळत होते. क्रॉली 9 धावा, रूट 5 आणि सिब्ली 2 धावा करून माघारी परतले. दुसरीकडे, भारतीय संघासाठी अक्षर पटेलने इंग्लिश टीमची सुरुवात खराब करत लंचपर्यंत 2 विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने 1 गडी बाद केला. (IND vs ENG 4th Test 2021: एमएस धोनीची बरोबरी करत Virat Kohli ने रचला इतिहास, भारतीय कर्णधारांच्या एलिट यादीत संयुक्तपणे पटकावले पहिले स्थान)
चौथ्या अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लिश संघ टॉस जिंकून पहिले फलंदाजीला मैदानात उतरला, पण भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या 6 ओव्हरमधेच इंग्लंडला पहिला धक्का दिला. फिरकीपटू अक्षरने डावातील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंड ओपनर डोम सिब्लीला त्रिफळाचीत केले. त्यामुळे 8 चेंडूत अवघ्या 2 धावांवर सिब्ली पव्हेलियनला परतला. त्यानंतर पटेलने इंग्लंडला दुसरा दणका दिला आणि सलामीवीर झॅक क्रॉलीला सिराजच्या हाती कॅच आऊट केलं आहे. झॅकने 9 धावा केल्या. इंग्लंड कर्णधार जो रुट सलग तिसऱ्यांदा धावा करण्यात अपयशी ठरला. सिराजने रुटला 5 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आणि इंग्लिश संघाने अवघ्या 30 धावांवर 3 विकेट गमावल्या. यानंतर, स्टोक्स आणि बेअरस्टोच्या जोरीने लंचपर्यंत भारतीय गोलंदाजांचा सावधपणे सामना करत संघाला आणखी नुकसान होऊ दिले नाही.
दोन्ही संघातील मालिकेबद्दल बोलायचे तर टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला मात्र, पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत जबरदस्त कमबॅक केलं. अहमदाबाद येथे सुरु असलेला चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे.