IND vs ENG 3rd Test Day 2: रूट नॉन-स्टॉप! इंग्लिश कर्णधाराने ठोकले भारताविरुद्ध मालिकेतील तिसरे शतक, अनेक मोठे विक्रम केले काबीज

इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने तिसऱ्या कसोटीत तुफानी शतकाच्या बळावर अनेक मोठ्या विक्रमांची ढीग उभारला आहे. जो रूटने इंग्लंडसाठी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके केली आहेत.

जो रूट (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 3rd Test Day 2: भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर (Headingley Stadium) खेळला जात आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने  (Joe Root) तिसऱ्या कसोटीत तुफानी शतकाच्या बळावर अनेक मोठ्या विक्रमांची ढीग उभारला आहे. जो रूटने इंग्लंडसाठी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके केली आहेत. रूटच्या नावावर आता 39 शतकांची नोंद झाली आहेत. त्याने माजी इंग्लिश कर्णधार कुकचा विक्रम मोडला. अ‍ॅलिस्टर कुकच्या (Alastair Cook) नावावर सर्व फॉरमॅटमध्ये 38 शतके आहेत. याव्यतिरिक्त रूट इंग्लंडसाठी कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 2021 मध्ये आतापर्यंत 1398 धावा केल्या आहेत. यापूर्वी माजी कर्णधार कुकने 2015 मध्ये 1,364 धावा केल्या होत्या. रूटने कर्णधार म्हणून 12 वे कसोटी शतक झळकावले. यासह त्याने कुकची बरोबरी केली आहे. (IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps: इंग्लंड कर्णधार Joe Root चे तुफानी शतक, हेडिंग्लेवर दुसऱ्या दिवसाखेर ब्रिटिशांची भारतावर 345 धावांची आघाडी)

इतकंच नाही तर आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्मचा आनंद लूट असणाऱ्या रूटने भारताविरुद्ध यंदाच्या मालिकेत सलग तीन शतके केली आहेत. रुटने नॉटिंगहॅम कसोटीत (Nottingham Test) शतक झळकावले. त्यानंतर रूटने लॉर्ड्सवरही (Lords) नाबाद शतक झळकावले आणि आता त्याने लीड्समध्ये शंभरी धावसंख्येची हॅटट्रिक केली आहे. रूटने नॉटिंगहॅममध्ये 109 आणि लॉर्ड्सवर नाबाद 180 धावा ठोकल्या होत्या. रूटला भारतीय गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करणे आवडते असे दिसत आहे करत त्याने टीम इंडिया (Team India) विरुद्ध 8 कसोटी शतके केली आहेत. त्याने स्टीव्ह स्मिथ, विव रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि रिकी पाँटिंगची यांची बरोबरी केली आहे. तसेच रूटने भारताविरुद्ध यंदाच्या मालिकेत 500 धावांचा टप्पाही पार केला. रूटने दुसऱ्यांदा भारताविरुद्धच्या  कसोटी मालिकेत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडचा एकही फलंदाज आजवर अशी कामगिरी करू शकला नव्हता.

सामन्याबद्दल बोलायचे तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 423/8 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून पहिल्या डावाच्या जोरावर भारतावर 345 धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात भारताला 78 धावांवर तंबूत पाठवले होते. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळावर रूटचे वर्चस्व राहिले, ज्याने मालिकेतील तिसरे आणि वर्षातील सहावे कसोटी शतक झळकावले. त्याने 165 चेंडूत 121 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय सलामीवीर रोरी बर्न्स (61), हसीब हमीद (68) आणि डेविड मलान (70) यांनी यजमान ब्रिटिशांसाठी अर्धशतकी धावसंख्या गाठली. दुसरीकडे, भारतासाठी मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज होता, ज्याने तीन विकेट काढल्या. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना 2 तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.