IND vs ENG 3rd D/N Test Day 1: अक्षर पटेलने दिग्गजांच्या पंक्तीत मिळवले स्थान तर इंग्लंडच्या नावे लाजिरवाणा विक्रम, पहा सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड

तिसऱ्या अहमदाबाद टेस्टच्या दिवसाच्या पहिल्या दिवसाखेर यजमान संघाने 3 विकेट गमावून 99 धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवसादरम्यान काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

टीम इंडिया (Photo Credit; Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd D/N Test Day 1: यजमान टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड (England) संघातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्याडे/नाईट टेस्ट (Day/Night Test) सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. तिसऱ्या अहमदाबाद टेस्टच्या (Ahmedabad Test) दिवसाच्या पहिल्या दिवसाखेर यजमान संघाने 3 विकेट गमावून 99 धावा केल्या आहेत. सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक फलंदाजी करत 62 चेंडूत 12वे कसोटी अर्धशतक ठोकले. 24 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या सामन्यात लोकल बॉय अक्षर पटेलने (Axar Patel) एकहाती वर्चस्व गाजवले आणि 5 इंग्लिश फलंदाजांना माघारी पाठवलं. अक्षरला अनुभवी ज्येष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने चांगली साथ दिली आणि 3 विकेट घेतल्या, तर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माला 1 विकेट मिळाली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने एकाकी झुंज दिली आणि 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. सामन्याच्या पहिल्या दिवसादरम्यान काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 3rd Test Day 1: भारतीय फिरकीपटूंनी मोडिली इंग्लंडची कंबर; दिवसाखेर टीम इंडियाच्या 3 बाद 99 धावा, रोहित शर्माचे शानदार अर्धशतक)

1. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने पहिल्या डावात 6 विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले. कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन सामन्यात डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा करणारा तो भारताचा तिसराच गोलंदाज आहे. यापूर्वी, मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी यांनी हा पराक्रम केला होता.

2. इशांत शर्मा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 11वा क्रिकेटर ठरला. इशांतव्यतिरिक्त सुनील  गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीस लक्ष्मण, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, हरभजन सिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही या यादीत समावेश आहे.

3. इंग्लंडने आजच्या सामन्यात पहिल्या डावात नोंदवलेली 112 ही धावसंख्या त्यांची भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमधील चौथी सर्वाधिक निचांकी धावसंख्या ठरली. भारताविरुद्ध इंग्लंडची सर्वाधिक नीचांकी धावसंख्या 101 आहे.

4. इशांत शर्मा एकही वर्ल्ड कप सामना न खेळता 100 टेस्ट सामना खेळणारा फक्त पाचवा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला. व्हीव्हीस लक्ष्मण, इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, माजी ऑस्ट्रेलियन जस्टीन लँगर, न्यूझीलंडचे कॉलिन कॅड्रे यांनाही वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली नाही मात्र यांनी कसोटी सामन्यात शंभरी पार केली आहे.

5. अक्षर पटेल दिवस/रात्र कसोटी सामन्यात भारताकडून पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. शिवाय, अक्षर डे/नाईट टेस्टमधील एकूण 6वा आणि दुसरा फिरकी गोलंदाज आहे. अक्षरापूर्वी वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशुने 2016 मध्ये 49 धावा देत पाकिस्तानच्या 8 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.

6. कपिल देवनंतर 100 कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.

7. जॉनी बेअरस्टो भारतात मागील सहा डावात चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 112 धावांच्या प्रत्युत्तरात 13 धावांनी पिछाडीवर आणि 7 विकेट शिल्लक असल्याने यजमान संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्येच्या निर्धारित असेल. दुसरीकडे, फक्त विकेट्स इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून देऊ शकते.