IND vs ENG 2nd Test Day 3: जो रूटच्या शतकाने इंग्लंडची पहिल्या डावात 391 धावांवर मजल, दिवसाखेर टीम इंडियावर घेतली 27 धावांची नाममात्र आघाडी

कर्णधार जो रूटच्या तडाखेबाज नाबाद 180 धावांच्या बळावर इंग्लंडने 128 ओव्हरमध्ये 391 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियावर 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव यापूर्वी 364 धावांवर आटोपला होता.

जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 3 Stumps: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील लॉर्ड्स कसोटी (Lords Test_ सामन्याच्या तिसऱ्या दिवसासोबत यजमान संघाचा पहिला डाव देखील संपुष्टात आला आहे. कर्णधार जो रूटच्या (Joe Root) तडाखेबाज नाबाद 180 धावांच्या बळावर इंग्लंडने 128 ओव्हरमध्ये 391 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियावर (Team India) 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव यापूर्वी 364 धावांवर आटोपला होता. रूट वगळता इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) 57 धावांची अर्धशतकी झुंज दिली. तसेच रोरी बर्न्सन 49, मोईन अली 27 आणि जोस बटलरने 23 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी बजावली. सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच इशांत शर्मा 3 आणि मोहम्मद शमीला 2 विकेट्स मिळाल्या. (IND vs ENG 2nd Test Day 3: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा 12 वा खेळाडू म्हणून ‘या’ व्यक्तीने घेतली मैदानात धाव, मजेदार व्हिडिओ पाहून थांबवू शकणार नाही हसू)

लॉर्ड्सवर तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 119/3 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र रुट-बेअरस्टोने पूर्ण खेळून काढत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दुसऱ्या सत्रातही सुरुवात त्यांनी चांगली केली होती पण अखेर सिराजने डावाच्या 79व्या ओव्हरमध्ये बेअरस्टोला विराट कोहलीकडे झेलबाद केले आणि त्याची व रुटची 121 धावांची भागीदारी तोडली. बेअरस्टोनंतर रुटला साथ देण्यासाठी बटलर मैदानात उतरला. यादरम्यान, रुटने त्याचे 22वे कसोटी शतक पूर्ण केले. रुट एकबाजू सांभाळताना बटलरने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. तथापि 54 धावांची अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर बटलर 23 धावांवर माघारी परतला. त्यानंतरही रुटने आपला चांगला खेळ कायम ठेवला. त्याला मोईन अलीने साथ देण्यास सुरुवात केली असून रुट आणि अलीने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही.

मात्र तिसऱ्या सत्रात मोठ्या प्रतीक्षेनंतर इशांतने मोईन अलीला 27 धावांवर कोहलीकडे झेलबाद करत भारताला विकेट मिळवून दिली. मोईन पाठोपाठ सॅम कुरन पहिला चेंडू खेळून माघारी परतला. सिराजने ऑली रॉबिन्सनला 6 धावांवर पायचित तर मार्क वूडला 5 धावांवर जाडेजाने धावचित केले. अशाप्रकारे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तरी भारतीय गोलंदाज ब्रिटिश कर्णधार रूटची महत्वपूर्ण विकेट घेण्यात अपयशी ठरले.