IND vs ENG 3rd Test Day 2: ‘कॅप्टन’ विराटची कमाल! अहमदबाद टेस्ट सामन्यात कोहलीने MS Dhoni यालाही सोडलं पिछाडीवर, बनला भारतातील यशस्वी कर्णधार

यजमान संघाचा हा विजय कर्णधार विराट कोहली याच्यासाठी विशेष ठरला. इंग्लिश टीमविरुद्ध मिळवलेल्या या विजयाने विराट भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. विराटच्या नेतृत्वात कसोटी संघाचा हा 22वा विजय ठरला.

विराट कोहली आणि एमएस धोनी (Photo Credit: Instagram/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 2: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात टीम इंडियाने (Team India) 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. यजमान संघाचा हा विजय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी विशेष ठरला. इंग्लिश टीमविरुद्ध मिळवलेल्या या विजयाने विराट भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. विराटच्या नेतृत्वात कसोटी संघाचा हा 22वा विजय ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कामगिरी आपल्या नावावर करण्यासाठी विराटने वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) पिछाडीवर ठाकलं. मायदेशात धोनीच्या नेतृत्वात भारताने 21 कसोटी सामने जिंकले आहेत तर कोहलीने चेन्नईमधील दुसरा सामना जिंकताच धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. विराट आणि धोनीपूर्वी या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांचा देखील समावेश आहे. (IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अक्षर-अश्विनच्या फिरकीची जादू, पिंक-बॉल टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय)

टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारतात 13, गांगुलीच्या 10 आणि गावस्कर यांच्या कर्णधारपदी असताना 7 विजय मिळवले आहेत. कोहलीच्या एकूणच रेकॉर्डबद्दल बोलायचे तर कोहली यापूर्वीच सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 58 कसोटींत 34 कसोटी सामने जिंकले असून 14 सामने गमावले आणि 10 अनिर्णित राहिले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने 60 कसोटी सामन्यांपैकी संघाने 27 सामने जिंकले आणि 18 गमावले. तर 15 सामने अनिर्णीत राहिले होते. दरम्यान, दिवस/रात्र टेस्टपूर्वी धोनीचा विक्रम मोडण्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने प्रत्येकाचे मन जिंकणारे उत्तर दिले. विराट म्हणाला, "हे पूर्णपणे निरुपयोगी गोष्टी आहेत आणि दोन भिन्न लोकांची तुलना केली जात आहे हे बाहेरून कदाचित छान वाटेल. पण त्याचा आपल्या सर्वांवर परिणाम होत नाही. आमच्या सर्वांमध्ये परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांसाठी सन्मान आहे व आमच्या माजी कर्णधाराचा आदर आहे."

विराटने धोनीच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2011 मध्ये विराटने कसोटी पदार्पण करत लवकरच संघात आपले स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर, 2014 च्या उत्तरार्धात धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली ज्यानंतर विराटला कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले.