IND vs ENG 2nd Test Day 1: लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावे; राहुलचे दिमाखदार शतक, रोहितची ‘हिटमॅन’ स्टाइल फलंदाजीने इंग्लंड बॅकफूटवर

पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 3 विकेट्स गमावून केएल राहुलचे धमाकेदार शतक व रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 276 धावा केल्या आहेत. लॉर्ड्सवर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल 127 धावा व अजिंक्य रहाणे 1 धाव करून खेळत होते.

भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 1: टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यात लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 3 विकेट्स गमावून 90 ओव्हरमध्ये केएल राहुलचे (KL Rahul) धमाकेदार शतक व रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 276 धावा केल्या आहेत. नॉटिंगहम येथील पहिला कसोटी सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण दिले असून मालिकेत आघाडी घेण्यासाठी इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणारा दुसरा सामना महत्त्वाचा आहे. लॉर्ड्सवर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल 127 धावा व अजिंक्य रहाणे 1 धाव करून खेळत होते. दुसरीकडे, जेम्स अँडरसन (James Anderson) आणि ओली रॉबिन्सन यांना वगळता भारतीय फलंदाजांनी अन्य गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अँडरसनने दोन तर रॉबिन्सनने एक विकेट काढली. (IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंड विरोधात KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक, लॉर्ड्सवर शतक झळकावणारा बनला दहावा भारतीय फलंदाज)

इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजी निवडली आहे. पावसाच्या लंपडावामुळे वेळेवर सुरु न होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे उशीराने सुरु झालेल्य सामन्यात भारताकडून राहुल आणि शर्मा यांच्या जोडीने भारतासाठी बचावात्मक सुरुवात केली. अँडरसन, ओली रॉबिन्सन भेदक गोलंदाजी करत सुरुवातीला भारतीय खेळाडूंवर वरचढ ठरत होते. टीम इंडियाची स्लो सुरुवात झाली पण रोहितने सॅम कुरनच्या सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये चार चौकार ठोकले आणि धावसंख्येचा वेग वाढवण्यास सुरुवात केली. संयमी खेळी करत भारताचा सलामीवीर रोहितने 13 वे अर्धशतक झळकावले. रोहित आक्रमक फलंदाजी करत असताना राहुलने एक बाजू सांभाळत त्याला साथ दिली. दोंघांनी दुसऱ्या सामन्यात शतकीय भागीदारी करून दिली. यादरम्यान रोहित अखेर परदेशात पहिले कसोटी शतक करेल असे दिसत असताना अँडरसनने 83 धावांवर त्याला त्रिफळा उडवला.

अनुभवी चेतेश्वर पुजारा जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि अवघ्या 9 धावा करुन बाद झाला. अखेरीस दिवसाचा खेळ संपायला काहीच ओव्हर शिळ्लक असताना भारताला मोठा झटका बसला आणि रॉबिन्सनने कर्णधार विराटला 42 धावांवर झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं.