IPL Auction 2025 Live

IND vs ENG 2nd Test 2021: दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी ‘या’ घातक खेळाडूला इंग्लिश टीम देऊ शकते विश्रांती, टीम इंडियासाठी ठरला होता त्रासदायक

संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी याबाबत सूचित केले आहे. एम.ए चिदंबरम स्टेडियमवर अँडरसनने दुसर्‍या डावात तीन विकेट घेतल्या आणि सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित केला.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd Test 2021: भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) दुसर्‍या कसोटी सामन्यात विश्रांती मिळू शकते. संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड (Chris Silverwood) यांनी याबाबत सूचित केले आहे. एम.ए चिदंबरम स्टेडियमवर अँडरसनने दुसर्‍या डावात तीन विकेट घेतल्या आणि सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित केला. पहिल्या डावात अँडरसननेही दोन विकेट्स घेतल्या. पण टीमच्या नियमित बदलण्याच्या धोरणामुळे अँडरसनला दुसर्‍या कसोटी सामन्यात विश्रांती मिळू शकते असे इंग्लंडचे प्रशिक्षक सिल्व्हरवुड यांनी सूचित केले आहे. सिल्व्हरवुडने माध्यमांना सांगितले, "मी विजयी संघ बदलण्यास नाखूष नाही, जर ते संघ आणि खेळाडूंसाठी चांगले असेल तर. पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने चांगली कामगिरी केली पण पुढे काय होते ते पहावे लागेल." (IND vs ENG T20I 2021: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लंड संघ जाहीर, ‘या’ घातक खेळाडूंचे पुनरागमन)

ते पुढे म्हणाले की, "स्टुअर्ट ब्रॉड आणि अँडरसन एकत्र खेळू शकतील की नाही यावर मी विचार करीत आहे. दोन्ही गोलंदाजांची स्थिती चांगली आहे पण, सद्य परिस्थितीत काय करता येईल ते पाहावे लागेल. आमच्याकडे संघात अनेक गोलंदाज आहेत, जे आम्ही कोणत्याही सामन्यात घेऊ शकू. संघात एवढे मोठे कौशल्य असलेले खेळाडू असणे माझे भाग्य आहे." अष्टपैलू मोईन अलीला खेळवण्यावर सिल्व्हरवुड म्हणाले, "प्रत्येक गोष्टीचा विचार केला जात आहे. जर आम्हाला वाटले की अलीची गरज आहे तर आमच्याकडे नियमित बदल करण्याचा पर्याय आहे. अली त्याच्या चांगल्या क्षमतेसाठी परिश्रम घेत आहे." पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 227 धावांनी पराभूत करून चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील पुढील सामना 13 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

दुसरीकडे, जोफ्रा आर्चर (Jofra Archer) देखील दुखापतीमुळे दुसऱ्या चेन्नई टेस्टला मुकणार आहे. आर्चरला आर्चरला पहिल्या सामन्यात उजव्या हाताच्या कोपराला वेदना होत होत्या. त्या वेदनेत वाढ झाल्याने त्याला इंजेक्शन घ्यावे लागले आहे. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसेल, अशी इंग्लंड संघ व्यवस्थापनाला आशा आहे. अशास्थतीत, आर्चरच्या जागी दुसऱ्या सामन्यात अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश केला जाऊ शकतो.