IND vs ENG 1st Test: सॅम कुरन आणि मोहम्मद सिराज यांच्यात झाला हायवोल्टेज ड्रामा, कोहलीला करावी लागली मध्यस्ती; पाहा व्हायरल व्हिडिओ

इंग्लंडचा फलंदाज सॅम कुरनही सिराजच्या संतापजनक वृत्तीपुढे थंड दिसत होता. सिराज आणि कुरन यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामामुळे भारत-इंग्लंड मालिकेची आवड आणखी वाढली आहे. तब्बल तीन-चार चेंडूपर्यंत हे सर्व सुरु राहिले. यानंतर विराट कोहली तिथे पोहोचला आणि सिराजला शांत राहण्यास सांगितले.

मोहम्मद सिराज आणि सॅम कुरन (Photo Credit: twitter)

Mohammad Siraj sledge Sam Curran: नॉटिंगहम कसोटीच्या (Nottingham Test) चौथ्या दिवशी भारतीय (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) वेगळ्याच मनस्थितीत दिसला. इंग्लंडचा (England) फलंदाज सॅम कुरनही (Sam Curran) सिराजच्या संतापजनक वृत्तीपुढे थंड दिसत होता. सिराजला यापूर्वी कधीच अशा वृत्तीने पाहिले नव्हते. सिराजला पाहून स्वतः भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पुढे येऊन मध्यस्ती करावी लागली. सिराज आणि कुरन यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामामुळे भारत-इंग्लंड मालिकेची आवड आणखी वाढली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहममध्ये (Nottingham) खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. भारताला सामना जिंकण्यासाठी अंतिम दिवशी आणखी 157 धावांची गरज आहे. (IND vs ENG 1st Test: नॉटिंगहम टेस्ट दरम्यान जेव्हा जेम्स अँडरसन आणि मोहम्मद सिराज यांच्यात झाली गरमागरमी Watch Video)

या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये परस्पर संघर्ष पाहायला मिळाला.भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लिश अष्टपैलू सॅम कुरन चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावा दरम्यान मैदानावरच एकमेकांशी भिडले. सिराजने दुसऱ्या डावात एकूण दोन विकेट्स घेतल्या. रोरी बर्न्स आणि जॉनी बेअरस्टोला त्याने पॅव्हिलियनमध्ये धाडलं. चौथ्या दिवशी कुरन त्याचा कर्णधार जो रूटसोबत फलंदाजी करत होता. दरम्यान, कुरानने सिराजच्या चेंडूवर शानदार चौकार मारला. सिराज यावर नाराज झाला आणि मैदानावरच स्लेजिंग करू लागला. सिराज प्रत्येक चेंडूनंतर कुरनकडे जायचा आणि त्याला डोळे दाखवल्यानंतर तो पुढचा चेंडू टाकण्यासाठी जायचा. तब्बल तीन-चार चेंडूपर्यंत हे सर्व सुरु राहिले. यानंतर विराट कोहली तिथे पोहोचला आणि सिराजला शांत राहण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्यात इंग्लंड संघाने कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 95 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडची चमकदार कामगिरी असूनही भारताला या 95 धावांचा फायदा मिळाला. जसप्रीत बुमराह सामन्यात बॉलने नायक ठरला. बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, पहिल्या डावादरम्यानही बुमराहने चार गडी बाद केले होते.