IND vs ENG 1st Test: जो रूटने रचला इतिहास, अ‍ॅलिस्टर कुकला पछाडत इंग्लंड खेळाडूंच्या ‘या’ यादीत नंबर वनच्या सिंहासनावर झाला विराजमान

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये रूट इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत आज रूटने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला मागे टाकले आहे. कुकने सर्व स्वरूपांमध्ये एकूण 15,737 धावा केल्या.

जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test: इंग्लंडचा (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) नॉटिंगहम (Nottingham) येथे सुरु असलेल्या भारताविरुद्ध (India) कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात एक मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये रूट इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत आज रूटने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (Alastair Cook) मागे टाकले आहे. जो रुट आज ट्रेंट ब्रिजवर फलंदाजीला आला तेव्हा तो कुकच्या विक्रमाच्या 22 धावांनी पिछाडीवर होता. 22 व्या ओव्हरमध्ये रूटने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर कव्हर ड्राईव्ह खेळत चौकार मारला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. दरम्यान, भारताविरुद्ध रूट सध्या 52 धावांवर खेळत आहे. (IND vs ENG 1st Test Day 1: रिषभ पंतने DRS घेण्यासाठी विराट कोहलीला पटवले; कॅच व स्टंप आऊट न करता भारताला मिळवून दिले मोठे यश, व्हिडिओ पाहून म्हणाल वाह!)

कुकने आपल्या कारकिर्दीत खेळाच्या सर्व स्वरूपांमध्ये एकूण 15,737 धावा केल्या. दरम्यान, इतर ब्रिटिश फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर केविन पीटरसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने इंग्लंडसाठी सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 13,779 धावा केल्या आहेत. इयन बेल 13,331 धावांसह पाचव्या स्थानावर आहे आणि ग्राहम गूच 13,190 धावांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. जो रूटने हा विक्रमी पल्ला गाठण्यासाठी तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 290 सामने खेळले. कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 शतके ठोकली आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 33 आणि एकदिवसीय सामन्यात 5 शतकी खेळी केली आहेत. दुसरीकडे, जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये 16 शतकांसह एकूण 36 शतके केली आहेत.

तसेच जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 34,357 धावा केल्या आहेत. कुमार संगकारा 28,016 धावांसह दुसऱ्या आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग 27,483 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच जो रूट या यादीत 29 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना अवघ्या 135 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं.