IND vs AUS: भारताला अजून एक धक्का; दुखापतीमुळे अखेरच्या कसोटी मधून Hanuma Vihari बाहेर, इंग्लंडविरुद्धही मालिका खेळणे कठीण
दुखापतीनंतर चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही हे तपासणीनंतर फिजिओने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विहारीची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनच्या रिपोर्टनंतर कळेल
सिडनी कसोटीत (Sydney Test Match) ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार फलंदाजी करून भारताला अपयशापासून वाचवणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari) चौथ्या कसोटीमधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळला जाणार आहे. सिडनी येथे तिसर्या कसोटीच्या पाचव्या दिवशी हनुमानाने दुखापतग्रस्त असूनही 43 षटकांपर्यंत फलंदाजी केली आणि सामना अनिर्णित केला. सिडनी कसोटीत अखेरच्या दिवशी फलंदाजी करताना हनुमाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, तरीही तो सामना संपण्यापर्यंत फलंदाजी करत राहिला आणि 161 चेंडूत 23 धावा काढून नाबाद परतला.
सामना संपल्यानंतर हनुमाचे स्कॅन करण्यात आले, मंगळवारी अहवाल येणे अपेक्षित आहे. दुखापतीनंतर चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही हे तपासणीनंतर फिजिओने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विहारीची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनच्या रिपोर्टनंतर कळेल असे बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले. जर त्याला ग्रेड 1 ची दुखापत झाली असेल तर तो कमीतकमी 4 आठवड्यांसाठी बाहेर बसेल. अशा परिस्थितीत केवळ ब्रिस्बेनच नव्हे तर तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर पडेल.
चौथ्या कसोटी सामन्यात हनुमा बाहेर पडल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून मयंक अग्रवाल त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. आणखी एक पर्याय म्हणजे, जर टीम मॅनेजमेंटने शक्य असल्यास रिद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून ब्रिस्बेन येथे संधी द्यावी व सिडनीत 97 धावा ठोकणार्या रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाज म्हणून समाविष्ट करावे. (हेही वाचा: बाबुल सुप्रियो यांची दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या संथ खेळीवर आक्षेपार्ह पोस्ट, नेटिझन्सने भाजप खासदाराला धरलं धारेवर)
असे सांगितले जात आहे की, विहारी आणि पंत दोघांनाही फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी वेदनशामक औषध देण्यात आले होते. ब्रिस्बेनमध्ये शार्दुल ठाकूर रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो, कारण जडेजा देखील जखमी आहे.