ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या विक्रमी कामगिरीने जुळला अनोखा योगायोग, इंग्लंडने नोंदवला दणदणीत विजय

महत्वाची गोष्ट म्हणजे जेम्स अँडरसनचा 500 वा बळीही क्रेग ब्रेथवेट हाच ठरला होता.अँडरसनने देखील विंडीजविरुद्ध हा पराक्रम केला होता,

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (Photo Credit: Getty)

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मॅनचेस्टर कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी एक मोठी कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा ब्रॉड जगातील 7 वा गोलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर स्टुअर्ट ब्रॉड इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात 500 कसोटी विकेट घेणारा दुसरा गोलंदाजही ठरला आहे. ब्रॉडच्या आधी इंग्लंडकडून त्याचा सहकारी जेम्स अँडरसनने (James Anderson) यापूर्वी हा पराक्रम केला होता. 2017 मध्ये अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात 500 कसोटी विकेट घेण्याचा विक्रम केला. ब्रॉडच्या या कामगिरीमुळे विंडीजविरुद्ध कसोटी सामन्यात एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला (Kraigg Brathwaite) बाद करून ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधील 500 विकेट पूर्ण केले.  (ENG vs WI 3rd Test: स्टुअर्ट ब्रॉडची '500 क्लब'मध्ये एंट्री; जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रासह दिग्ग्जच्या पंक्तीत मिळवले स्थान)

महत्वाची गोष्ट म्हणजे जेम्स अँडरसनचा 500 वा बळीही क्रेग ब्रेथवेट हाच ठरला होता.अँडरसनने देखील विंडीजविरुद्ध हा पराक्रम केला होता आणि आता 3 वर्षानंतर ब्रॉडने साथी वेगवान गोलंदाजाच्या पराक्रमाची बरोबरी केली. इंग्लंडकडून आजवर फक्त दोन गोलंदाजांनी 500 विकेटचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, गोलंदाजीव्यतिरीक्त पहिल्या डावात अर्धशतक झळकावत ब्रॉडने आपली फलंदाजीतली कमालही दाखवली. ब्रॉडच्या अर्धशतकाच्या जोरावरच इंग्लंडने पहिल्या डावात 269 धावांचा पल्ला गाठला आणि पहिल्या डावात गोलंदाजीदरम्यान विंडीजच्या 6 फलंदाजांना माघारी धाडले. इंग्लंडच्या विजयात ब्रॉडने महत्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जाणाऱ्या यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची अखेरचा कसोटी सामना 269 धावांनी जिंकून आणि मालिका 2-1 ने जिंकली.

दुसरीकडे, ब्रॉडच्या अगोदर मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबळे, जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा आणि कर्टनी वाल्श यांनी कसोटीत 500 हुन अधिक विकेट्स घेल्या आहेत. एकाच देशातील दोन गोलंदाजांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेटचा टप्पा ओलांडण्याचीही दुसरी वेळ आहे. यापूर्वी वॉर्न आणि मॅकग्रा यांनी ऑस्ट्रेलियाकडून या कामगिरीची नोंद केली.