ENG vs WI 2nd Test: इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने तोडला कोरोना प्रोटोकॉल, टीमने मॅन्चेस्टर येथील दुसर्या टेस्ट सामन्यातून केले बाहेर
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज, 16 जुलै पासून मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी बनविलेल्या बायो-सिक्योर प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचमधून वगळण्यात आले आहे.
इंग्लंड (Englan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) दरम्यान आज, 16 जुलै पासून मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे, पण त्यापूर्वी यजमान टीमला मोठा झटका बसला आहे. दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) रूपात इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आर्चरला कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी बनविलेल्या बायो-सिक्योर प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचमधून वगळण्यात आले आहे. दरम्यान, आता आर्चरच्या जागी इंग्लंड सॅम कुर्रान, ओली रॉबिन्सन आणि क्रिस वोक्स मधून कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरेल. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना भारतीय कसोटी सामन्यात दुपारी 3:30 वाजेपासून खेळला जाईल. या सामन्याच्या काही तासांपूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आर्चरला दुसर्या कसोटी सामन्यातून काढून टाकले असल्याचे जाहीर केले. दरम्यान, यानंतर आर्चरला पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे आणि या दरम्यान त्याची दोन्ही कोविड-19 टेस्ट नकारात्मक आल्यानंतरच तो टीमबरोबर सामील होऊ शकेल. (ENG vs WI 1st Test: जेम्स अँडरसनच्या 'या' कृतीने सोशल मीडियावर वादाला सुरुवात, बॉलवर लाळ लावल्याचा यूजर्सकडून आरोप, पाहा Video)
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या 13 खेळाडूंमध्ये आर्चरला स्थान मिळाले होते. पण त्याच्या एका चुकीमुळे आता त्याला बाहेर पडावे लागत आहे. जैव-सुरक्षित प्रोटोकॉलच्या उल्लंघनाबद्दल आर्चरने माफी मागितली आणि कबूल केले की त्याने केवळ स्वत:लाच नाही तर संपूर्ण टीमलाही धोक्यात घातले आहे. आर्चर म्हणाला, “मी जे केले त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. मी फक्त स्वत:लाच नाही तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापनाला संकटात टाकले. मी माझ्या कृतींचे दुष्परिणाम पूर्णपणे स्वीकारतो आणि मला जैव-सुरक्षित बबलमधील प्रत्येकाची मनापासून दिलगिरी व्यक्त करायची आहे. विशेषत: मालिका धोक्यात असताना सामना गमावल्यामुळे मला खूप वेदना होत आहेत. मला असे वाटते की मी दोन्ही संघांना निराश केले आहे आणि मला पुन्हा खेद आहे."
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या ऐतिहासिक कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. या मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून पाहिल्या जाणार्या मालिका आयोजित करण्यासाठी ईसीबीने अत्यंत खबरदारी घेतली आहे.