DC vs RR IPL 2021: आयपीएलमध्ये उद्यापासून डबल हेडरचा थरार, दिल्ली प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मिळू शकतो पहिला मान
टी-20 लीगमध्ये आता शनिवारपासून डबल हेडर सामने सुरु होत आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी अबु धाबी येथे होईल. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल आहे. जर संघाने राजस्थानविरुद्ध सामना जिंकला, तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याचा पहिला मान मिळू शकतो.
DC vs RR IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू झाला. टी-20 लीगमध्ये आता शनिवारपासून डबल हेडर सामने सुरु होत आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) अबु धाबी येथे दुपारी 3.30 वाजता होईल. रिषभ पंतच्या (Rishabh Pat) नेतृत्वातील दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल आहे. जर संघाने राजस्थानविरुद्ध सामना जिंकला, तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याचा पहिला मान मिळू शकतो. लक्षात घ्यायचे म्हणजे दिल्ली संघाने गेल्या मोसमातही अंतिम फेरी गाठली होती, पण मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. संघ सध्या आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. (Delhi Capitals चे कर्णधारपद काढून घेतल्यावर श्रेयस अय्यरने सोडले मौन, Rishabh Pant वर केले धक्कादायक विधान)
सध्याच्या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. संघाचे 14 गुण आहेत. दुसरीकडे, जर आपण राजस्थानबद्दल बोललो तर संघाने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. शेवटच्या सामन्यात संघाने पंजाब किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स आपला परफॉर्मन्स कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर संघ कधीही चॅम्पियन बनू शकला नाही. दुसरीकडे, दिल्ली संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले आलेले नाही. पण चालू हंगामात त्याच्या फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. ज्येष्ठ फलंदाज शिखर धवनने 9 सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 422 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतके केली आहेत. स्पर्धेतील इतर कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत 400 धावांचा टप्पा गाठला नाही. पृथ्वी शॉने 319 आणि कर्णधार रिषभ पंतने 248 धावा केल्या आहेत. तसेच वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने 11 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यात एनरिच नॉर्टजेने 2 विकेट्स घेतल्या.
याशिवाय राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत त्यांचा कोणताही फलंदाज 300 धावांचा टप्पा पार करू शकलेला नाही. कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 281 धावा केल्या आहेत. मात्र, शेवटच्या सामन्यात महिपाल लेमरोर, एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली कामगिरी बजावली. गोलंदाजीमध्ये क्रिस मॉरिसने एकूण 14 विकेट घेतले आहेत. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट 9 च्या वर आहे. तसेच युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने पंजाबच्या फलंदाजांना शेवटच्या सामन्यात शेवटच्या सामन्यात संघाच्या विजयाचा नायक ठरला होता.