Ashes 2021-22: जो रूटला काढून ‘या’ तडाखेबाज अष्टपैलूच्या हाती द्या इंग्लंड कसोटी संघाची कमान, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजचा सल्ला

जो रूटच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनने रूटच्या तुलनेत तडाखेबाज अष्टपैलू बेन स्टोक्सला संघाचा कर्णधार बनण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

जो रूट (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर अ‍ॅशेस मालिकेच्या (Ashes Series) पहिल्या दोन्ही सामन्यात जो रूटच्या इंग्लंड (England) संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात रूटच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जो रूटच्या (Joe Root) नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनने (Brad Haddin) रूटच्या तुलनेत तडाखेबाज अष्टपैलू बेन स्टोक्सला (Ben Stokes) संघाचा कर्णधार बनण्यासाठी पाठिंबा दिला आहे. स्टोक्स हुशार कर्णधार आहे, असे मत हॅडिनने मांडले. हॅडिनने इंग्लंडचा कर्णधार म्हणून रूटच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून बेन स्टोक्सने रूटच्या जागी यावे असे सुचवले आहे. (Ashes 2021-22: नंबर 1 कसोटी फलंदाज Joe Root च्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार, अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडच्या सलग दोन पराभवामुळे दिग्गजांनी उठवले प्रश्न)

ब्रिटिश कसोटी कर्णधार यंदा बॅटने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या वर्षी 1600 हून अधिक कसोटी धावा करून रूट 2021 मध्ये त्याच्या समकालीन खेळाडूंपेक्षा वरचढ ठरला आहे. तथापि, त्याच्या कर्णधार कौशल्याबद्दल असे म्हटले जाऊ शकत नाही. या अनुभवी क्रिकेटपटूच्या चुकीचे निर्णयामुळे अनेकदा संघाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. हॅडिनने या संदर्भात Triple M Cricket ला सांगितले की, “चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ दाखवला आणि त्यावेळी रूट मैदानाबाहेर होता. बेन स्टोक्स कमांडवर होता आणि तो एकदम शांत दिसत होता. त्याच्याकडे रणनीती होती आणि गोलंदाजांनी स्टंपवर पूर्ण लांबीने गोलंदाजी केली. 20 धावांच्या आत ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावल्या आणि यजमान कांगारू संघ दडपणाखाली आले. मात्र रूट पुन्हा मैदानात येताच इंग्लंड संघाला पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे बेन स्टोक्स हा हुशार कर्णधार आहे असे मला वाटते.”

पिंक-बॉल कसोटीत 275 धावांनी झालेल्या पराभवानंतर गोलंदाजावर दोषारोप केल्याबद्दल हॅडिनने रूटचीही क्लास घेतली. “रूट प्रशिक्षकासह निवड समितीमध्ये सामील आहे आणि प्रशिक्षक बाहेर आला व म्हणाला ‘आम्ही योग्य संघ निवडले आहेत.’ नंतर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले ‘तुम्ही योग्य संघ निवडले नाहीत’ आणि जो रूट म्हणतो, ‘तुम्ही योग्य लांबीने गोलंदाजी करत नाही आहात’,” 44 वर्षीय म्हणाला. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पराभवांनंतर रूट निराश दिसला. इंग्लंडची कुठे चूक झाली याबद्दल बोलताना ब्रिटिश कर्णधाराने सांगितले की, गोलंदाजांनी योग्य भागात गोलंदाजी केली नाही.