Chennai Beat Delhi: चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला, दिल्लीचा 77 धावांनी केला पराभव
चेन्नईने 14 साखळी सामन्यांमध्ये आठ विजय आणि एक अनिर्णित सामन्यासह 17 गुण मिळवले आहेत. त्याचवेळी दिल्लीचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने तीन विकेट गमावत 223 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने 87 आणि ऋतुराज गायकवाडने 79 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ केवळ 146 धावाच करू शकला. चेन्नईकडून दीपक चहरने बॉलसह तीन बळी घेतले. मथिशा पाथिराना आणि महेश तिक्ष्णाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्णधार वॉर्नरने 86 धावा केल्या. या विजयासह चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईचे लीग टप्प्यात 17 गुण झाले आहेत. आता हा संघ दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफमधील पुढील सामना खेळेल. आता चेन्नईचे खेळाडू लखनौचा शेवटचा सामना हरावा अशी प्रार्थना करतील. या स्थितीत चेन्नई दुसऱ्या स्थानावर राहून पहिला क्वालिफायर खेळणार असून या संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतील.