Mumbai Harbour Line: जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या नागरिकांच्या समोर आला यमराज, पाहा व्हिडिओ

मात्र, असे करणे धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते.

Mumbai Harbour Line (Photo Credit: Twitter)

घाई-गडबडीत असणारे रेल्वे प्रवाशी किंवा रेल्वे स्थानकाशेजारील वसाहतीत राहणारे बहुतांश नागरिक जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ (Rail Tracks) ओलांडताना दिसतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते. प्रवाशांनी आणि नागरिकांनी हा धोका पत्कारू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येते. परंतु, तरीही बऱ्याच लोकांचे रेल्वे रुळ ओलांडणे अजूनही सुरूच आहे. हे जीवघेणे कृत्य आपल्या जीवावर बेतू शकतो, याची नागरिकांना जाण करून देण्यासाठी मुंबई हार्बर लाईनच्या (Mumbai Harbour Line) रेल्वे रुळावर चक्क यमराज (Yamraj) आवतरले आहेत. तसेच रेल्वे रुळावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना चेतावणी देताना दिसत आहेत.

मीडडेचे पत्रकार राजेंद्र बी.अकलेकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चार-पाच तरूण मुंबईच्या हार्बर लाईनवरील रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसत आहेत. तसेच नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडून धोका पत्कारू नये, याकरीता त्यांच्यातील एका व्यक्तीने चक्क यमराजची वेशभूषा केली आहे. याचबरोबर नागरिकांना आपल्या जीवनाचे महत्व पटवून देताना दिसत आहे. हे देखील वाचा- पुणे: डेटिंग अॅपच्या माध्यमातून नाव बदलून तरुणीची फसवणूक; 10 लाखांना घातला गंडा

पाहा व्हिडिओ-

याआधीही यूपीच्या मुरादाबाद येथून एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती यमराजची पोशाख घालून मास्क न घातलेल्या नागरिकांना समजावून सांगत होता. त्या व्हिडिओतील यमराजाच्या एका हातात मायक्रोफोन होता. ज्यात माझ्या कामाचे ओझे वाढवू नका, असे लिहले होते.