IPL Auction 2025 Live

Umer Sharif Death Hoax: सोशल मिडियावर व्हायरल झाली पाकिस्तानी अभिनेते-कॉमेडियन उमर शरीफ यांच्या मृत्यूची बातमी; समोर आले 'हे' सत्य

आपण ऑनलाईन जी माहिती वाचतो-पाहतो ती खरी आहे का याबाबतचे आपले अंदाज चुकू शकतात. कधी कधी तर अशा गोष्टी तपासल्याशिवाय त्या पुढे पाठवल्या जातात आणि त्यामुळे मोठा गदारोळ माजतो

Umer Sharif Death Hoax (Photo Credits: Twitter)

इंटरनेट ही एक अशी जागा आहे, जिथे कोणतीच गोष्ट प्रायव्हेट नसते आणि सोशल मिडियावर तर गोष्टी व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आपण ऑनलाईन जी माहिती वाचतो-पाहतो ती खरी आहे का याबाबतचे आपले अंदाज चुकू शकतात. कधी कधी तर अशा गोष्टी तपासल्याशिवाय त्या पुढे पाठवल्या जातात आणि त्यामुळे मोठा गदारोळ माजतो. या आधी अशी अनेक उदाहरणे समोर आली जिथे अनेक सेलेब्जना चुकीच्या बातम्यांमध्ये गोवले गेले किंवा अगदी त्यांच्या मृत्युच्या खोट्या बातम्याही व्हायरल झाल्या. आता पाकिस्तानी अभिनेता, उमर शरीफबाबतही (Umer Sharif) तेच घडले आहे. इंटरनेटवर उमर शरीफ यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती.

उमर शरीफ यांचा व्हीलचेअरवरील जुना फोटो शेअर करत लोकांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली व हाहा म्हणता ती व्हायरलही झाली. यामध्ये उमर यांना छातीचा संसर्ग, खोकला आणि फ्लूमुळे लाहोरच्या रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अभिनेत्याच्या कुटुंबाच्या जवळच्या स्त्रोतांनी ही बातमी फेटाळली आणि द एक्सप्रेस ट्रिब्यूनला सांगितले की, उमर बरे आहेत आणि ते घरी आहे. यानंतर काही पाकिस्तानी कलाकार आणि प्रसारमाध्यमांनी अशा बनावट बातम्या व्हायरल करणाऱ्या लोकांवर टीका केली आहे.

व्हायरल होत असलेला फोटो सध्याचा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. उमर त्यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात होते, परंतु सध्या परिस्थिती  काही गंभीर नाही, अशीही माहिती मिळत आहे. ते त्यांच्या हृदयाच्या समस्यांमुळे अस्वस्थ आहे, परंतु ही परिस्थितीत जीवघेणी नाही, असे सूत्राने पुढे सांगितले. (हेही वाचा: Blue Lobster, Scotland मध्ये मच्छिमाराच्या जाळ्यात आला 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर)

दरम्यान, मोहम्मद उमर यांचा जन्म 19 एप्रिल 1955 रोजी कराची येथे झाला. त्याना ‘कॉमेडीचा बादशाह’ असेही संबोधले जाते. जॉनी लीव्हर आणि राजू श्रीवास्तव यांच्यासारख्या लोकप्रिय भारतीय विनोदी कलाकारांनी त्यांचा ‘द गॉड ऑफ एशियन कॉमेडी’ म्हणून गौरव केला आहे.